गर्दी टाळण्यासाठी तोफखान्यात सोडतीद्वारे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:22 AM2021-05-20T04:22:34+5:302021-05-20T04:22:34+5:30
अहमदनगर : कोरोना लसीकरणासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी तोफखाना आरोग्य केंद्रावर आता सोडतीद्वारे लसीकरण केले जाणार आहे. माजी नगरसेवक धनंजय ...
अहमदनगर : कोरोना लसीकरणासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी तोफखाना आरोग्य केंद्रावर आता सोडतीद्वारे लसीकरण केले जाणार आहे. माजी नगरसेवक धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून गणेश मंडळांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात येत असून, दररोज चिठ्ठ्या टाकून लसीकरणाचे नियोजन केले जाणार आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत शहरात सर्वाधिक रुग्ण तोफखाना परिसरात होते. हा पत्रे लावून बंद करण्यात आला होता. दुसऱ्या लाटेत या भागातील रुग्णसंख्या घटली. तोफखाना परिसरात महापालिकेचे आरोग्य केंद्र आहे. या केंद्रात लस दिली जाते. परंतु, लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी दररोज एका भागातील ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येणार आहे. या भागातील २५ गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही उपक्रमात सहभाग घेतला आहे. मंडळांच्या नावाने चिठ्ठ्या टाकल्या जातील. ज्या मंडळाची चिठ्ठी निघेल, त्या दिवशी त्याच भागातील नागिरकांना लस मिळेल. नागरिकांची यादी तयार करण्यात येणार आहे. जेवढे डोस उपलब्ध आहेत, तेवढ्याच नागरिकांना फोन करून बोलावून घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
....
- तोफखान्याच्या आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. शहरासह शहराबाहेरील लोक या लसीकरण केंद्रावर लसीकरणासाठी येतात. त्यामुळे तोफखाना भागातील नागरिक लसीकरणापासून वंचित राहात आहेत. गर्दीतून संसर्ग होऊ नये, यासाठी गणेश मंडळांकडून लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी गणेश मंडळांना सहकार्य करावे.
- ॲड. धनंजय जाधव, माजी नगरसेवक
....
सूचना: फोटो आहे.