लस देण्याचे केंद्राचे नियोजन ढासळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:20 AM2021-05-23T04:20:30+5:302021-05-23T04:20:30+5:30
जलसंपदा मंत्री पाटील यांनी शनिवारी (दि. २२) संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील निळवंडे धरणाच्या कालव्यावरील आढळा सेतू पुलाची पाहणी ...
जलसंपदा मंत्री पाटील यांनी शनिवारी (दि. २२) संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील निळवंडे धरणाच्या कालव्यावरील आढळा सेतू पुलाची पाहणी करत कालव्यांच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्यांच्यासमवेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार डॉ. सुधीर तांबे आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, ज्यांना लसीचा पहिला डोस मिळाला त्यांना दुसरा डोस वेळेत मिळाला पाहिजे, असा आमचा आग्रह आहे. १८ ते ४८ वर्ष वयोगटातील नागरिकांचेदेखील लसीकरण लवकर सुरू केले पाहिजे. लसनिर्मिती करणाऱ्यांवर संपूर्ण नियंत्रण केंद्र सरकारचे आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार आम्हाला लस मिळत नाही. लस वेळेत मिळाल्यास राज्यात लसीकरणाचा कार्यक्रम वेळेत पूर्ण करू, असा आम्हाला विश्वास आहे.
केंद्र सरकारने जगात लस निर्यात करण्यावर भर दिला आणि आज त्यांचे दुष्परिणाम आपल्याला दिसत आहेत. सहा कोटी लसी परदेशात गेल्या. त्यात महाराष्ट्रातील निम्या लोकांचे लसीकरण पूर्ण झाले असते. महाराष्ट्रात आणि देशातील सर्व राज्यांत लसीकरणाचे नियोजन करण्यात केंद्राला अपयश आल्याचे दिसते आहे.