भाजप पुरस्कृत चार केंद्रांवर लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:16 AM2021-05-31T04:16:59+5:302021-05-31T04:16:59+5:30
अहमदनगर : कोरोनावरील लसीकरणाच्या श्रेयवादाच्या लढाईत आता भाजपनेही उडी घेतली आहे. रविवारी सर्व केंद्र बंद असताना केवळ भाजप पुरस्कृत ...
अहमदनगर : कोरोनावरील लसीकरणाच्या श्रेयवादाच्या लढाईत आता भाजपनेही उडी घेतली आहे. रविवारी सर्व केंद्र बंद असताना केवळ भाजप पुरस्कृत केंद्रांवरच फक्त लसीकरण केले. त्यामुळे इतर केंद्रांवर उद्या लस मिळेल की नाही, याबाबत साशंकता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला रविवारी सात वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त शहर भाजपच्या वतीने लसीकरण मोहीम राबविण्यात आली. रविवारी लसीकरण बंद असते; मात्र भाजपच्या पदाधिकारी, नगरसेवकांच्या मागणीनुसार शहरातील शुभम मंगल कार्यालय, दादा चौधरी शाळा, लोणार गल्ली आणि गुरुदत्त लॉन या चार केंद्रांवर लस देण्यात आली. महापालिकेकडून त्यासाठी दोन हजार लस मात्रा उपलब्ध करून दिल्या गेल्या. शहर भाजपच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी लसीकरण केंद्रावर हजर राहून लसीकरण करून घेतले. प्रभागातील नावे सुचविलेल्यांनाच फक्त लस दिली गेली. लस घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. इतर २४ लसीकरण केंद्र मात्र बंद ठेवण्यात आली होती.
लसीकरणावरून शहरात गोंधळ सुरू आहे. लसीकरण मोहिमेत सुसूत्रता आणण्यासाठी महापालिका आयुक्तांनी सर्वच प्रभागांत १७ लसीकरण केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली. परंतु, काही राजकीय पक्षांनी हस्तक्षेप केल्याने त्यात आणखी वाढ केली. त्यामुळे लसीकरण केंद्रांची संख्या २९ वर पोहोचली असून, त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र वाढविले असले तरी लसींची संख्या वाढलेली नाही. त्यामुळे एका केंद्राच्या वाट्याला साधारण २० डोस येतात. त्यामुळे हे डोस द्यायचे कुणाला असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यातही नगरसेवकांचा हस्तक्षेप सुरूच असून, काही ठिकाणी केंद्रावरच वाद होताना दिसत आहेत.
...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला सात वर्षे पूर्ण झाल्याने शहरात लसीकरण मोहीम राबविण्यात आली असून, रविवारी दिवसभरात दोन हजार नागरिकांना लस देण्यात आली.
-भैया गंधे, शहर जिल्हाध्यक्ष भाजप
...
लसींची पळवापळवी
लसीकरण केंद्रांना महापालिकेकडून लसींचे वाटप केले जाते. लसींचे समान वाटप करण्याचा आयुक्तांचा आदेश असला तरी नगरसेवक आपल्या केंद्रासाठी जास्तीच्या लसींची मागणी करीत असून, लसींचीही पळवापळवी सुरू आहे. त्यामुळे लसीकरणाच्या गोंधळात आणखी भर पडली आहे.