शासकीय रुग्णालयात लसीकरण, खासगीत प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:37 AM2021-03-04T04:37:03+5:302021-03-04T04:37:03+5:30
अहमदनगर : साठ वर्षांवरील तसेच व्याधीग्रस्त ४५ वर्षांवरील नागरिकांना १ मार्चपासून कोरोना लस देण्याची घोषणा शासनाने केली. मात्र, नोंदणीतील ...
अहमदनगर : साठ वर्षांवरील तसेच व्याधीग्रस्त ४५ वर्षांवरील नागरिकांना १ मार्चपासून कोरोना लस देण्याची घोषणा शासनाने केली. मात्र, नोंदणीतील अडथळा, तसेच खासगी रुग्णालयांची तयारी नसल्याने अद्याप खासगी रुग्णालयांत ही लस दाखलच झालेली नाही. तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर येत्या तीन-चार दिवसांत ही प्रक्रिया सुरळीत होईल, अशी शक्यता आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात सध्या १६ ग्रामीण व ८ महापालिकेच्या अशा एकूण २४ आरोग्य केंद्रांवर आरोग्य विभाग, तसेच फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, शासनाने १ मार्चपासून साठ वर्षांवरील, तसेच व्याधीग्रस्त ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याची घोषणा केली. शासनाच्या म्हणण्याप्रमाणे शासकीय रुग्णालयांत ही लस मोफत, तर खासगी रुग्णालयांत २५० रुपयांना उपलब्ध होईल. त्यासाठी आरोग्य विभागाच्या कोविन डाॅट जीओव्ही डाॅट इन या संकेतस्थळावर नोंदणी करण्यास सांगण्यात आले. मात्र, पहिल्या दिवशीच भारतभर हे संकेतस्थळ कोलमडले. त्यामुळे नोंदणीच होऊ शकली नाही. अनेक खासगी रुग्णालयांना तर लसीकरणाबाबत माहितीच नव्हती. त्यामुळे पहिला दिवस गोंधळातच गेला.
दरम्यान, मंगळवारी लसीकरण मोहीम बंद होती. आरोग्य विभागाला लसीकरण मोहिमेबद्दल विचारले असता, सध्या सुरू असलेल्या २४ शासकीय आरोग्य केंद्रांत आरोग्य, महसूल, पोलिसांचे लसीकरण सुरू आहे. त्याच केंद्रांवर ६० व ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरण सुरू राहणार आहे. मागणी वाढली तर लसीकरण केंद्रांत वाढ केली जाईल, अशी माहिती समजली.
नगर जिल्ह्यात ३५ खासगी रुग्णालयांत लसीकरण केंद्र जाहीर झाले होते. मात्र, त्यातील ४ रुग्णालयांकडे आयसीयू सेंटर नसल्याने आता ३१ रुग्णालयांतच लस मिळणार आहे. जिल्हा रुग्णालयातून या खासगी रुग्णालयांना लाॅगिन आयडी तयार करून दिले जातील. त्यानंतर खासगी रुग्णालयांनी लसीचे शुल्क भरून मागणी केल्यावर जिल्हा परिषदेकडून त्यांना डोस उपलब्ध होतील. या प्रक्रियेत आणखी तीन ते चार दिवस जाणार असल्याने खासगी रुग्णालयांतून लसीकरण होण्यास अजून अवधी लागणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागातून मिळाली. दरम्यान, लसीकरण नोंदणीतील अडथळे हळूहळू दूर होत आहेत. मंगळवारी अनेकांनी नोंदणी केली. त्यांना पुढील तीन-चार दिवसांत लस मिळण्याची शक्यता आहे.
शासकीय केंद्रात २५६जणांना लस
लसीकरण नोंदणीत संकेतस्थळात अडथळा आल्याने पहिल्या दिवशी म्हणजे १ मार्चला नगर जिल्ह्यात एकही नोंदणी झाली नाही. मात्र, जिल्हा रुग्णालयांतर्गत असलेल्या ग्रामीण रुग्णालयांनी नोंदणी नसतानाही ६० वर्षांवरील २११ व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त ४५ अशा एकूण २५६जणांना लस दिली. या सर्वांना केवळ ओळखीचा पुरावा पाहून रुग्णालयाने लस दिली. त्यासाठी रुग्णालयाच्या यंत्रणेतच त्यांची नोंदणी करण्यात आली.
------------
४२ हजार डोस शिल्लक
पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटकडून आतापर्यंत नगर जिल्ह्यासाठी १ लाख ५ हजार ३१० कोरोना लसीचे डोस उपलब्ध झालेले आहेत. १६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरण सुरू असून आतापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांना १९,३१६, महसूल कर्मचाऱ्यांना १०९३, पोलिसांना २८००, गृह व कामकाज विभागाला १४६१, रेल्वे सुरक्षा दलाला १९१ असा एकूण २७ हजार ४५९ जणांना पहिला डोस दिला आहे, तर यातीलच ४८९३ जणांना दुसरा डोस दिलेला आहे. दुसरीकडे ३० हजार डोस लष्कराला देण्यात आलेले आहेत. त्यामुळे सध्या जिल्हा परिषदेकडे ४२ हजार डोस शिल्लक आहेत.