दुकानदारांना लसीकरण बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:20 AM2021-04-15T04:20:33+5:302021-04-15T04:20:33+5:30
अहमदनगर : राज्य शासनाने बुधवारी रात्री आठपासून लागू केलेली संचारबंदी जिल्ह्यातही लागू झाली आहे. मंगळवारी राज्य शासनाने जारी केलेला ...
अहमदनगर : राज्य शासनाने बुधवारी रात्री आठपासून लागू केलेली संचारबंदी जिल्ह्यातही लागू झाली आहे. मंगळवारी राज्य शासनाने जारी केलेला लॉकडाऊनचा आदेश जसाच्या तसा अंमलात आणण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी सात ते रात्री आठ या कालावधीत उघडे राहणार असून या सेवेतील दुकानदारांना लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनची नगर जिल्ह्यात बुधवारी रात्री आठपासून अंमलबजावणी सुरू झाली. बुधवारी सायंकाळी सर्व जिल्हाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांसमवेत व्हिडीओ कॉन्फरन्स झाली. त्यामध्ये सूचना मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्थानिक आदेश जारी केला. मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून केलेल्या घोषणा आणि राज्य शासनाने काढलेला आदेश जसाच्या तसाच नगर जिल्ह्यातही लागू होणार आहे. अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने सकाळी सात ते रात्री आठपर्यंत सुरू राहणार आहेत. १४ एप्रिलच्या रात्री आठपासून ते एक मेच्या सकाळी सातपर्यंत विनाकारण घराबाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील सुरू असलेल्या दुकानदारांना लसीकरण बंधनकारक असणार आहे. तसेच लॉकडाऊनच्या काळात जी दुकाने बंद आहेत, त्या दुकानदारांनी बंदच्या काळात लसीकरण करून घ्यायचे आहे. नियमांचे पालन करीत नसलेल्या ग्राहकाला दुकानदाराने सेवा दिल्यास ग्राहकाला पाचशे रुपये आणि दुकानदाराला एक हजार रुपये दंड करण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.
---
लग्नासाठी २५ जणांना परवानगी
संचारबंदीच्या काळात मंगल कार्यालयांमध्ये केवळ २५ जणांच्या उपस्थितीत लग्न करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही अट पूर्वी ५० जणांची होती. मंगल कार्यालयात सेवा देणाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असणे बंधनकारक आहे. निगेटिव्ह प्रमाणपत्र नसल्यास सदर व्यक्तीला एक हजार रुपये व मंगल कार्यालय मालकाला १० हजार रुपये दंड करण्यात येणार आहे.
-----------