प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांवर लसीकरण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:20 AM2021-05-08T04:20:45+5:302021-05-08T04:20:45+5:30
श्रीरामपूर : कोरोना लसीकरणासाठी आरोग्य केंद्रावर होणाऱ्या गर्दीतून संसर्गाचा फैलाव होण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या उपकेंद्रावर ...
श्रीरामपूर : कोरोना लसीकरणासाठी आरोग्य केंद्रावर होणाऱ्या गर्दीतून संसर्गाचा फैलाव होण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासनाने प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या उपकेंद्रावर आठवड्यातील एक दिवस निश्चित करून लसीकरण हाती घ्यावे, अशी सूचना आमदार लहू कानडे यांनी केली आहे.
आमदार कानडे यांनी मतदारसंघातील देवळाली प्रवरा, टाकळीमिया, मांजरी, पढेगाव, टाकळीभान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट दिली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेची माहिती घेतली. गावातील प्रमुख नागरिक तसेच सरपंच व उपसरपंच यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी तालुका आरोग्य अधिकारी तसेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना पत्र देऊन काही सूचना केल्या आहेत. जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी त्यांनी चर्चा करत लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी व कोरोनाचा संभाव्य फैलाव टाळण्यासाठी बदल सुचवले.
प्राथमिक आरोग्य केंद्रावर १८ ते ४४ तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण सुरू आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. अनेक नागरिकांना लसीअभावी परत फिरावे लागते. त्यामुळे उपकेंद्रावर आठवड्यातील एक दिवस लसीकरण मोहीम हाती घ्यावी. तेथील स्थानिक तीन ते चार गावांकरिता लसीकरण करावे, आरोग्य केंद्रावर तेथील प्रमुख गावातचे लसीकरण करणे उचित ठरेल, असे आमदार कानडे यांनी म्हटले आहे.
नगरपालिकेच्या हद्दीतील शहरवासीयांच्या लसीकरणाचा ताण ग्रामीण भागावर पडत आहे. त्यामुळे काहीसा विस्कळीतपणा आला आहे. त्याऐवजी नगरपालिका रुग्णालय अथवा पालिकेच्या शाळांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करावे. त्यामुळे शहरवासीयांना घरापासून जवळच लस मिळू शकेल, असे कानडे यांनी म्हटले आहे.
--–
टोकन पद्धत अवलंबावी
लशीचा उपलब्ध साठा लक्षात घेऊन नोंदणी करणाऱ्या नागरिकांना केंद्रावर बोलवावे. तेथे टोकन पद्धत अवलंबण्यात यावी. टोकन दिलेल्या लोकांचे लसीकरण करावे अन्य नागरिकांना मात्र दुसऱ्या दिवशी बोलवावे, अशी सूचना कानडे यांनी केली आहे.
---