राशीन येथे पोलीस बंदोबस्तात लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:21 AM2021-05-08T04:21:23+5:302021-05-08T04:21:23+5:30
राशीन : कर्जत तालुक्यातील राशीन प्राथमिक आरोग्य रूग्णालयात कोरोना लसीकरणासाठी शुक्रवारी पहाटेपासूनच रांगा लावल्या. अचानक झालेल्या गर्दीने आरोग्य कर्मचाऱ्यांची ...
राशीन : कर्जत तालुक्यातील राशीन प्राथमिक आरोग्य रूग्णालयात कोरोना लसीकरणासाठी शुक्रवारी पहाटेपासूनच रांगा लावल्या. अचानक झालेल्या गर्दीने आरोग्य कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. केवळ दोनशेच डोस मिळाल्याचे समजल्याने गोंधळ सुरू झाला. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची तातडीने पोलिसांना त्या ठिकाणी बोलाविले. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात लसीकरणास सुरुवात झाली.
दरम्यान, ४५ वयोगटातील नागरिकांनी लसीकरणासाठी येऊन टोकन घ्यावे, असे आवाहन प्राथमिक रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले होते. नागरिकांनी टोकन घेण्यासाठी पहाटेपासून आरोग्य केंद्राच्या आवारात नंबर लावत गर्दी केली. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. २०० डोस येथील आरोग्य केंद्रास उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यातील १०० डोस हे दुसरा डोस घेणाऱ्यांना तर १०० डोस नव्याने लस घेणाऱ्यांना दिले जाणार असल्याचे सांगताच गोंधळ उडाला. त्यानंतर पोलिसांना बोलाविण्यात आले. त्यानंतर ५० टक्के नागरिक निघून गेले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप व्हरकटे, डॉ. अंजूम सय्यद, सहाय्यक आरोग्य अधिकारी व्ही. एन. गर्जे, आरोग्य सेवक एस. के. जगताप, फाळके, कांता सोनवणे यांच्यासह पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट व कर्मचारी उपस्थित होते.
--
०७ राशीन कोविड
राशीन प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर नागरिकांनी कोरोना लसीकरणासाठी लावलेली रांग.