व्हॅलेंटाईनचा गुलाब निघाला प्रेमिकांच्या भेटीला; प्लास्टीक गुलाबाचा परिणाम, विक्रीत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 04:13 PM2020-02-12T16:13:11+5:302020-02-12T16:16:25+5:30
व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर लांब दांडीच्या गुलाब पुष्पांची काढणी अंतिम टप्प्यात आहे़ व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर प्रेमिकांच्या हाती जाण्यासाठी व अव्यक्त भावना व्यक्त करण्यासाठी हा गुलाब बाजारपेठेकडे झेपावला आहे़
प्रमोद आहेर ।
शिर्डी : व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर लांब दांडीच्या गुलाब पुष्पांची काढणी अंतिम टप्प्यात आहे. व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर प्रेमिकांच्या हाती जाण्यासाठी व अव्यक्त भावना व्यक्त करण्यासाठी हा गुलाब बाजारपेठेकडे झेपावला आहे.
शिर्डीलगत असलेल्या निमगाव येथील अमोल चांगदेव गाडेकर हे पॉली हाऊसमध्ये लांब दांडीच्या गुलाबाची शेती करतात. शिर्डी व परिसरात हार बनवण्यासाठी लागणारा डिव्हाईन जातीचा गुलाब पिकवला जातो. गाडेकर मात्र व्हॅलेंटाईन डे किंवा एरवी बुके व डेकोरेशनसाठी वापरण्यात येणारा टॉप सिक्रेट जातीचा गुलाब लावतात. त्यात ते रेड, पिंक व व्हाईट पिंक रंगाचे नयन मनोहर गुलाब फुलवतात. व्हॅलेंटाईन डेसाठी डिसेंबरमध्ये गुलाबाची छाटणी केली जाते. त्यानंतर खत, पाणी व औषध फवारणी असते, एकापेक्षा अधिक आलेल्या कळ्या खुडून टाकाव्या लागतात. एका दांडीला आलेल्या तीन-चार कळ्या खोडून एकच गुलाब जोपासला जातो.
जेवढी गुलाबाची दांडी लांब तेवढा भाव अधिक मिळतो. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर गुलाब काढायला सुरूवात केली जाते. डिसेंबरमध्ये पुरेशी थंडी नसली तरी गुलाब लवकर काढणीवर येतो. अशावेळी प्रत्येक गुलाबाला जाळीची कॅप घालून उमलण्यास रोखले जाते.
शिर्डी व परिसरात सर्रास पिकवला जाणारा डिव्हाईन गुलाब सध्या साठ रूपये शेकडा आहे. मात्र अमोल गाडेकर यांच्या शेतातील गुलाब साडेसात रूपयांना एक विकला जातो. एका बंडलमध्ये वीस गुलाब असतात़ एक बंडल दीडशे ते साडे तीनशे रूपयांपर्यंतही विकला जातो. हाच गुलाब बाजारात आकर्षक रूप देऊन वीस रूपये ते शंभर रूपये नगाने विकला जातो.
व्हॅलेंटाईनला या लांब दांडीच्या गुलाबाला खूप मागणी असते़ अमोल हे शिर्डीबरोबर दिल्ली, मुंबई, भोपाळ अशा देशातील विविध शहरांमध्ये आपले गुलाब पाठवितात. यंदा ते जवळपास चाळीस हजार गुलाब व्हॅलेंटाईनला बाजारात पाठवत आहेत. फुलांची काढणी सध्या जोरात सुरू आहे.
बाजारात आता आकर्षक प्लास्टीकचे गुलाब आल्याने ओरिजनल गुलाब शेतीला त्याचा चाळीस टक्के फटका बसला आहे़ त्यातच डावणीचा रोग पडतो. यंदा जास्त पावसाने उत्पादन व दर्जा घटला, असे राहाता तालुक्यातील निमगाव येथील गुलाब पुष्प उत्पादक अमोल गाडेकर यांनी सांगितले.