भाजीपाला महागला
By Admin | Published: September 17, 2014 11:37 PM2014-09-17T23:37:36+5:302024-09-04T12:10:32+5:30
अहमदनगर : सध्या भाजीपाला बाजारात चांगलीच तेजी आहे़ पितृपंधरवाडा सुरू असल्याने पालेभाज्यांसह फळभाज्यांनाही मोठी मागणी आहे़
अहमदनगर : सध्या भाजीपाला बाजारात चांगलीच तेजी आहे़ पितृपंधरवाडा सुरू असल्याने पालेभाज्यांसह फळभाज्यांनाही मोठी मागणी आहे़ मागणीप्रमाणे बाजारात आवक होत नसल्याने भाजीपाल्याचे गेल्या पंधरा दिवसात २० ते ३० टक्यांनी दर वाढले आहेत़ पाच ते सात रुपयांना मिळणारी कोथंबिरीच्या जुडीसाठी २० ते २५ रुपये मोजावे लागत आहेत़ पितृपंधरवाड्यात मेथी, मुळा, आळू, गवार, भेंडी, कारली या भाज्यांचा पित्रजेवणात समावेश करण्यात येत असल्याने या भाज्यांना मोठी मागणी आहे़ जिल्ह्यात मध्यंतरी झालेल्या जोरदार पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले़ शहरातील बाजारपेठेत जिल्ह्यातील विविध तालुक्यातून माल विक्रीला आणला जातो़ मात्र, उत्पादित माल कमी झाल्याने तालुक्याच्या बाजारपेठेतच शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला अपेक्षित दर मिळत आहे़ त्यामुळे वाहतूक खर्च टाळण्यासाठी नगरच्या बाजारपेठेत सध्या माल आणला जात नाही़ जो माल येतो तो अगदी कमी प्रमाणात आहे़ बाजारातून मात्र, भाजीपाल्याला मोठी मागणी आहे़ त्यामुळे ठोक व्यापाऱ्यांकडूनही जास्त दराने मालाची विक्री होते़ घाऊक व्यापाऱ्यांकडून ग्राहकांना माल विकताना पुन्हा नफा मिळविला जात असल्याने भाजीपाला चांगलाच कडाडला आहे़ गणपती विसर्जनानंतर पितृपंधरवाड्याला सुरुवात झाली़ दि़ २४ सप्टेंबरपर्यंत पितृपक्ष चालणार आहे़
पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी घरोघरी पितृपक्षाची परंपरा जोपासली जाते़
पितरांसाठी केल्या जाणाऱ्या भोजनात मेथी, भेंड, मुळा, आळू, गवार, कारली आदी भाज्या बनविण्याची परंपरा आहे़ त्यामुळे या भाज्यांना सध्या सगळीकडेच मोठी मागणी आहे़ मागणीप्रमाणे आवक होत नसल्याने चांगलीच दरवाढ झाली असून, दोन भाज्या घ्यावयाच्या असेल तर किमान ५० रुपयांचा खर्च होतो़ त्यामुळे गृहिणींचे बजेट बिघडले आहे़ येणाऱ्या काळातही नवरात्र व दिवाळी सण असल्याने भाजीपाल्याचा बाजार असाच तेजीत राहण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)