आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचे भाव कडाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:15 AM2021-06-11T04:15:19+5:302021-06-11T04:15:19+5:30
अहमदनगर : लॉकडाऊन संपल्यानंतर बाजार समित्यांमधील व्यवहार सुरू झाले, मात्र आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. ...
अहमदनगर : लॉकडाऊन संपल्यानंतर बाजार समित्यांमधील व्यवहार सुरू झाले, मात्र आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. भाजीपाल्याचे ठोक दर कमी असले तरी किरकोळ बाजारात ते वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची झोळी रिकामीच राहिली आहे.
एप्रिलच्या १४ तारखेपासून कमी-अधिक प्रमाणात बाजार समितीमधील व्यवहार बंद करण्यात आले होते. मे महिन्यात ते पूर्ण बंदच होते. त्यामुळे भाजीपाला, फळे विक्रीचे व्यवहार बंद होते. शेतकरी थेट भाजीपाला विकत होते. आता बाजार समित्यांमधील व्यवहार सुरू झाले आहेत. पाऊस सुरू झाल्याने भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे तर दुसरीकडे कमी भावात माल खरेदी केला जात असल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. किरकोळ बाजारात भाज्यांचे भाव वाढले आहेत. त्याचा फटका मात्र सामान्य ग्राहकांना बसला आहे.
------------------
भाजीपाल्याचे भाव (प्रतिकिलो रुपये)
भाजी ठोक भाव किरकोळ भाव
भेंडी ३० ६०
गवार ५५ ८०
कोबी ११ ३०
फ्लावर ३० ५०
वांगे ४५ ४०
शेवगा ३७ ६०
भोपळा १२ ५०
टोमॅटो १० २०
काकडी १४ ३०
कोथिंबिर ७ (जुडी) २०
मेथी १० (जुडी) २५
पालक ६ (जुडी) १५
शेपू ७ (जुडी) १५
--------------
फळांचे भावही वधारले
ठोक बाजारात फळांचे भावही वाढले आहेत. मोसंबी ८५ रुपये, डाळिंब ७० रुपये, पपई १२ रुपये, चिकू २० रुपये, सफरचंद १०५ रुपये, हापूस अंबा ४५ रुपये, केशर अंबा ४० रुपये, लालबाग २५ रुपये किलो आहे. किरकोळ बाजारात फळांच्या किंमती ठोकपेक्षा दीड ते दुप्पट असल्याने सामान्य माणसांना फळे खाणेही आवाक्याबाहेर गेले आहे.
-----------
भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यात अनेक दिवसांपासून धंदा बंद होता. त्यामुळे ठोक भावही वाढले आहेत. तसेच किरकोळ बाजारात नेहमीपेक्षा दर वाढले आहेत. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर सर्वच किरकोळ विक्रेत्यांनीही दरवाढ केली आहे.
-एक विक्रेता, पाईपलाईन रोड