भाजीपाला खरेदीला जाताय; मोबाइल सांभाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:25 AM2021-07-07T04:25:45+5:302021-07-07T04:25:45+5:30
श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरात गेल्या दीड वर्षामध्ये १९ मोबाइल चोरीच्या घटनांची पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. यातील केवळ चार ...
श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरात गेल्या दीड वर्षामध्ये १९ मोबाइल चोरीच्या घटनांची पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. यातील केवळ चार मोबाइल पोलिसांनी गुन्हेगारांकडून हस्तगत केले आहेत. इतर गुन्ह्यांचा मात्र अद्यापही तपास लागलेला नाही. कोविड प्रादुर्भावामुळे २०२० पासून सातत्याने लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे मोबाइल चोरीच्या गुन्ह्यांची संख्या कमी झाल्याचे दिसत आहे. विशेषत: शहरातील आठवडे बाजार कोविडमुळे बंद राहिला. बसस्थानकातूनही मोजक्याच एसटी बसेसच्या फेऱ्या झाल्या. त्यामुळे तेथेही प्रवाशांची जेमतेम संख्या राहिली. यामुळे मोबाइल चोरीचे प्रकार घडले नाहीत.
अशा स्थितीतही चोरट्यांनी काही प्रमाणात का होईना डाव साधला. २०२० मध्ये ११ तर त्यानंतर जूनअखेर ८ मोबाइल चोरीचे गुन्हे शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. यातील मागील वर्षी ३ तर चालू वर्षात केवळ एका मोबाइलचा शोध लावण्यात यश आले. उर्वरित गुन्हे अद्यापही तपासाविना प्रलंबित आहेत.
----------
मोबाइल चोरीचे केंद्र
शहरातील आठवडे बाजार हेच प्रामुख्याने मोबाइल चोरीचे केंद्र राहिले आहे. त्याशिवाय बसस्थानक परिसर, भळगट रुग्णालयाजवळील परिसर येथेही सातत्याने हे प्रकार घडले आहेत. आठवडे बाजारातून शर्टच्या वरच्या खिशातून मोबाइल लांबविला जातो. बसस्थानकात चोरटे प्रवाशांसमवेत बसमध्ये बसतात, मात्र गाडी सुटताच मोबाइल काढून पसार होतात. भळगट रुग्णालयानजीक दुचाकीवरून येऊन मोबाइल पळविण्याच्या घटना घडल्या आहेत.
----------
लहान मुलांचा वापर
सराईत गुन्हेगारांकडून मोबाइल चोरीसाठी लहान मुलांचा वापर केला जातो. लहान मुलांवर शक्यताे नागरिकांना संशय येत नाही. त्याचा गुन्हेगार फायदा घेतात. गुन्हेगारांकडून मुलांना काही विशिष्ट रक्कम त्या मोबदल्यात दिली जाते.
----------
मोबाइल चोरीला जाताच हे करा
मोबाइल चोरीला जाताच पोलिसांशी संपर्क करावा. त्यानंतर सिम कार्ड ब्लॉक करावे. आयएमईआय क्रमांकाच्या मदतीने पोलीस मोबाइलचा शोध घेतात.
----------
घराच्या खिडकीमध्ये मोबाइल ठेवणे अथवा घराचा दरवाजा उघडाच ठेवणे असे प्रकार तपासादरम्यान दिसून आले. मोबाइलमध्ये नवनवीन फिचर समाविष्ट झाले आहेत. चोरीला आळा घालण्यासाठी त्यांचा वापर करावा. कारण आयएमईआय क्रमांक बदलण्याचे प्रकार होऊ शकतात.
संजय सानप,
निरीक्षक,
शहर पोलीस ठाणे, श्रीरामपूर.
--------