भाजीपाला कडाडला, डाळींनी गाठली शंभरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 12:15 PM2020-10-11T12:15:22+5:302020-10-11T12:16:10+5:30
अहमदनगर : मागील पंधरवड्यात झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे भाजीपाल्यांची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली. त्याचा परिणाम आवक कमी होण्यात झाला आणि भाजीपाल्यांचे दर चांगलेच कडाडले. डाळींचे उत्पादन घटल्याने, तसेच आवक कमी झाल्याने सर्व डाळींच्या भावात किलोमागे १५ ते २० रुपयांची दरवाढ झाली आहे. पुढील काही दिवसात डाळींचे भाव आणखी कडाडण्याची चिन्हे आहेत.
सुदाम देशमुख

आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांमध्ये जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत पाऊस सुरूच होता. पावसामुळे भाजीपाल्यांचे मोठे नुकसान झाले. आवक घटल्याने भाजीपाल्याचे दर चांगलेच वाढले आहेत. पुणे, मुंबई परिसरात मोठा पाऊस झाल्याने जिल्ह्यातील भाजीपाल्याला मोठी मागणी वाढली. परिणामी जिल्ह्यात तुटवडा निर्माण झाला आणि दरवाढ झाली. डाळींच्या भावातही १५ ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वच डाळी शंभरीपार गेल्या आहेत. पाऊस, डाळ मीलवर अद्याप कामगार येत नसल्याने पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.
यंदा पावसामुळे उडिदाचे उत्पादन कमी झाल्याने आपोआप तेजी निर्माण झाली असल्याने किराणा मालाचे भाव वाढले आहेत. जसा माल आला तसा तो विकला जात असून शिल्लकीचे प्रमाण कमी आहे. उत्पादन कमी हेच दरवाढीमागचे कारण आहे.
-संजय लोढा, ठोक व्यापारी
हरभºयाचे उत्पादन प्रचंड झाल्याने हरभरा डाळीचे भाव कमी झाले होते. मात्र आता सणासुदीचे दिवस सुरू झाल्याने हरभरा डाळीला मागणी वाढली आहे. बाहेरच्या राज्यात पाऊस झाला असून कामगारांची टंचाई असल्याने माल कमी प्रमाणात येत असून त्यामुळे दरवाढ झाली आहे.
-संजय साखरे, किराणा दुकानदार
दोन महिन्यांपासून पावसाचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे भाजीपाल्याची नासाडी झाली. भाजीपाला कमी असल्याने आणि मागणी वाढल्याने दरवाढ होत आहे.
-शरद बोबडे, विक्रेते