दहा टन लिंबू घेऊन निघालेले वाहन गायब : तिघांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:42 PM2019-06-25T12:42:29+5:302019-06-25T12:43:56+5:30
तालुक्यातील अरणगाव येथील गौरव लेमन कंपनीने 10 टन लिंबू भरून दिल्लीला पाठवलेले आयशर आठ दिवस होऊनही दिल्लीत न पोहचता प्रवासातच गायब होण्याची घटना उघडकीस आल्याने जामखेड तालुक्यातील लिंबू उत्पादकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
जामखेड : तालुक्यातील अरणगाव येथील गौरव लेमन कंपनीने 10 टन लिंबू भरून दिल्लीला पाठवलेले आयशर आठ दिवस होऊनही दिल्लीत न पोहचता प्रवासातच गायब होण्याची घटना उघडकीस आल्याने जामखेड तालुक्यातील लिंबू उत्पादकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
सहा लाख अठ्ठावीस हजार रुपये किंमत असलेल्या दहा टन वजनाच्या लिंबाची परस्पर विल्हेवाट लावली गेल्याचे समोर आले असून याप्रकरणी पुणे येथील न्यू सुनिल ट्रान्सपोर्ट या कंपनीच्या दोघा मालकांसह अज्ञात गाडी चालक अशा तिघांविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील गोवर्धन पांडूरंग राऊत हे अरणगाव सह परिसरातील गावांमधील लिंबू उत्पादक शेतक-यांकडून गौरव लेमन कंपनी या आडत दुकानाच्या माध्यमांतून लिंबूची खरेदी करतात. १५ जून रोजी नेहमीप्रमाणे लिंबू व्यापारी राऊत यांनी आपल्या आडत दुकानात खरेदी केलेले लिंबू दिल्लीला पाठवण्यासाठी पुणे येथील न्यू सुनिल ट्रान्सपोर्टचे मालक सुनिल पांडूरंग वनवे यांना दुरध्वनी करून गाडी पाठवण्यास सांगितले. त्यानुसार न्यू सुनिल ट्रान्सपोर्टकडून लिंबूचा माल घेऊन जाण्यासाठी आयशर गाडी ( युपी १७ टी १३४४ )अरणगावला त्याच दिवशी आली. १० टन लिंबू मालाचे बॉक्सचे वाहन दिल्ली येथील आझादपुर मार्केटमधील पी. एन. सन्स अॅण्ड कंपनीच्या दुकान नंबर ए - 250 मध्ये माल घेऊन जाणार होती.
रात्री अकरा वाजता लिंबाने भरलेली गाडी घेऊन दिल्लीकडे रवाना झाला होता. दरम्यान १७ जून रोजी गौरव लेमन कंपनीचे मालक गोवर्धन राऊत यांनी दिल्लीस्थित पी. एन. सन्स अॅण्ड कंपनीकडे फोन करून विचारणा केल्यानंतर अजूनपर्यंत आमच्याकडे गाडी पोहच झाली नसल्याची माहिती राऊत यांना दिली.
दरम्यान व्यापारी गोवर्धन राऊत यांनी जामखेड पोलिस स्टेशन तिघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. न्यू सुनिल ट्रान्स्पोर्ट कंपनीचे मालक पांडुरंग वनवे, सुनिल वनवे व अज्ञात गाडीचालक यांनी दिल्ली येथील व्यापार्याकडे घेऊन न जाता संगनमत करून गायब करून गोवर्धन राऊत यांची फसवणूक करून आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक पांडूरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश कांबळे हे करत आहेत.