वाहने सावलीत, ग्राहक उन्हात; वाळकी येथील सेंट्रल बँकेसमोरील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 04:32 PM2020-05-12T16:32:45+5:302020-05-12T16:33:31+5:30
‘वाहने सावलीत अन ग्राहक उन्हात’ अशी परिस्थिती नगर तालुक्यातील वाळकी येथील सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या शाखेत पहावयास मिळत आहे.
अहमदनगर : कोरोनामुळे लॉकडाऊन काळ सुरु असला तरी आर्थिक व्यवहार मात्र थांबवता येत नाहीत. यासाठी सर्वसामान्य ग्राहक पैशासाठी बँक गाठतात. या काळात बँका ग्राहक ांची काळजी घेण्यापेक्षा स्वत:च्या वाहनांची काळजी घेताना दिसत आहेत. ‘वाहने सावलीत अन ग्राहक उन्हात’ अशी परिस्थिती नगर तालुक्यातील वाळकी येथील सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या शाखेत पहावयास मिळत आहे.
नगर तालुक्यातील वाळकी हे मोठ्या लोकसंख्येचे बाजारगाव. या गावात सेंट्रल बँक आॅफ इंडियाची शाखा आहे. या शाखेत परिसरातील गावामधील शेतकरी तसेच निवृत्त पेन्शनधारकांचे खाते आहेत. या शाखेत राळेगण, गुंडेगाव, देऊळगाव सिध्दी, खडकी, वडगाव-तांदळी, बाबुर्डी यासह विविध गावातील नागरिकांची ये-जा बँकेत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँकेत कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. येणा-या ग्राहकांना रस्त्यावर उन्हात उभे केले जात आहे. त्यांना उभे राहण्यासाठी कसल्याही प्रकारच्या सावलीचीही सोय बँकेने अथवा ग्रामपंचायतीने केली नाही. त्यामुळे ग्राहकांना उन्हातच उभे राहावे लागत आहे. बँकेच्या इमारतीच्या सावलीमध्ये ग्राहक उभे राहू शकतात, मात्र या सावलीमध्ये बँकेचे अधिकारी-कर्मचारी दुचाकी उभ्या करतात. त्यामुळे ग्राहकांना नाविलाजाने उन्हात उभे राहावे लागत आहे.
सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याची गरज आहे. मात्र रांगेत उभे राहताना कसल्याही सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. बँकही कसल्याही प्रकारची खबरदारी घेत नाही. रस्त्यावर खडूने ओबडधोबड रेषा ओढल्या आहेत. यापलीकडे बँकने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत.
जेष्ठ नागरिकांचे हाल
परिसरातील गावातून जेष्ठ नागरिक बँकेत येतात. मात्र या नागरिकांना बँक रांगेत उभे करीत आहेत. त्यांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. तापमान ४० अंशाच्या पुढे गेल्याने जेष्ठानांही त्रास सहन करावा लागत आहे.