शेतातील खळे नामशेष होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:26 AM2021-02-05T06:26:54+5:302021-02-05T06:26:54+5:30
पिंपळगाव माळवी : नगर तालुका हा पूर्वापार दुष्काळी तालुका म्हणूनच संबोधला जात असून या भागातील ज्वारी हेच प्रामुख्याने ...
पिंपळगाव माळवी : नगर तालुका हा पूर्वापार दुष्काळी तालुका म्हणूनच संबोधला जात असून या भागातील ज्वारी हेच प्रामुख्याने मुख्य पीक होते; परंतु आज या भागातील शेतकरी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून पारंपरिक शेतीला फाटा देत आहेत. त्यामुळे शेतात सुगीच्या काळात होणारे खळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
पिंपळगाव माळवी पंचक्रोशीतील शेतकरी आधुनिक शेतीकडे झुकला असून गहू, बाजरी, ज्वारी पिकांबरोबरच नगदी पिके फळबाग, कांदा, ऊस, कोथिंबीर, भोपळा, फ्लॉवर, कोबी, मका, सोयाबीन, भुईमूग अशी पिके घेण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे एकीकडे नवीन तंत्रज्ञान आणि दुसरीकडे नामशेष होत चाललेल्या पारंपरिक शेती पद्धती दिसून येत आहेत. यामुळे पारंपरिक खळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पूर्वी शेतकरी शेतामध्ये गोल रिंगण तयार करून त्यावर ते बैलं फिरवून व शेणाने सारवून खळे तयार करत असत. ज्वारीच्या पेंढ्या यापासून तयार केलेले कोपी तयार करून या कोपितच सुगीचा हंगाम संपेपर्यंत तात्पुरता निवारा करत असे. या खळ्यात ज्वारीच्या पेंढ्या रचून ठेवत आणि त्यानंतर कणसं मोडून त्यावर बैलाची पात हाकत. परंतु, आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतातच प्लास्टिक कागदावर धान्य काढणीचे मळणी यंत्र आणून तासाभरातच ज्वारी, गहू, बाजरी तयार करत आहे.
फोटो ओळ ०१ पिंपळगाव माळवी
पिंपळगाव माळवी परिसरातील पूर्वीच्या काळचे पारंपरिक खळे व कोपी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.