रायगडाची राणी, कोंढाण्यावर स्वारी फेम प्रसिद्ध वगसम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 06:10 PM2021-05-25T18:10:28+5:302021-05-25T18:57:00+5:30
Kantabai Satarkar passes away: एक उत्तम अभिनेत्री, उत्तम गायिका, उत्तम वगनाट्य दिग्दर्शिका, उत्तम व्यवस्थापक अशा विविध भूमिका निभावताना कांताबाईंनी तमाशा क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. मराठी रंगभूमीवर पुरुषांनी स्त्रियांच्या भूमिका केल्याची अनेक उदाहरणे आहेत मात्र स्त्रीने पुरुषी भूमिका केल्याची उदाहरणे फार कमी पाहायला मिळतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - ख्यातनाम तमाशा कलावंत आणि वगसम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे वयाच्या 82 व्या वर्षी संगमनेर येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.
महाराष्ट्रातील लोककलेच्या क्षेत्रातील कांताबाई यांचे योगदान विलक्षण राहिले आहे. महाराष्ट्र शासनाने 2005 साली तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा पहिला विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार देऊन कांताबाईंचा सन्मान केला होता. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सदर करण्याचा बहुमान मिळाला होता. मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात तंबू लावून सिने-नाट्यसृष्टीतील मान्यवरांसाठी तमाशा सादर करण्याचा पहिला बहुमानही त्यांना मिळाला आहे.
एक उत्तम अभिनेत्री, उत्तम गायिका, उत्तम वगनाट्य दिग्दर्शिका, उत्तम व्यवस्थापक अशा विविध भूमिका निभावताना कांताबाईंनी तमाशा क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. मराठी रंगभूमीवर पुरुषांनी स्त्रियांच्या भूमिका केल्याची अनेक उदाहरणे आहेत मात्र स्त्रीने पुरुषी भूमिका केल्याची उदाहरणे फार कमी पाहायला मिळतील. कांताबाईनी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या भूमिका इतक्या हुबेहूब वठवल्या की पुरुष कलाकारांनाही त्या भूमिकांची नक्कल करावी वाटायचे, असा त्यांचा लौकीक होता. वयाच्या नवव्या वर्षी त्यांना साताऱ्यातील नवझंकार मेळ्यात नृत्याची संधी मिळाली आणि तिथून त्यांचा कलाप्रवास सुरू झाला. प्रारंभीच्या काळात सातारा जिल्ह्यातल्या सर्जेराव अहिरवाडीकर यांच्या तमाशात त्यांनी काम केले. तिथे त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर अनेक फडांकडून त्यांना विचारणा झाली. मात्र, घरच्यांनी नकार दिल्याने कांताबाईंनी एकटीनेच थेट मुंबई गाठले.
मुंबईत हनुमान थिएटरमध्ये दादू इंदुरीकरांच्या फडात त्या दाखल झाल्या. त्याचवेळी हनुमान थिएटरमध्ये तुकाराम खेडकर यांचाही तमाशा फड होता. खेडकरांचा तमाशाचा बाज बघितल्यावर त्यांनी खेडकरांच्या तमाशात जाण्याचा निर्णय घेतला. तुकाराम खेडकर यांच्या तमाशात कांताबाईंमधील अस्सल कलाकार घडत गेला. खेडकर आणि कांताबाई या जोडीला अमाप लोकप्रियता मिळाली. पुढे खऱ्या आयुष्यातही ही जोडी एक झाली. रायगडाची राणी अर्थात पन्हाळगडचा नजरकैदी, पाच तोफांची सलामी, महारथी कर्ण, हरिश्चंद्र तारामती, जय विजय, गवळ्याची रंभा अशा अनेक धार्मिक, पौराणिक, रजवाडी, सामाजिक आशय असलेल्या वगनाट्यातून ही जोडी ग्रामीण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.
गवळ्याची रंभा, गोविंदा गोपाळा, १८५७ चा दरोडा, तडा गेलेला घडा, अधुरे माझे स्वप्न राहिले, कलंकिता मी धन्य झाले, असे पुढारी आमचे वैरी, डोम्या नाग अर्थात सख्खा भाऊ पक्का वैरी, कोंढाण्यावर स्वारी आदी वगनाट्यात कांताबाईनी केलेला अभिनय प्रेक्षकांना विशेष भावला.
कांताबाईंचे संपूर्ण कुटुंब आजही एकत्र राहून तमाशा रंगभूमीची सेवा करीत आहे. त्यांचे चिरंजीव कलाभूषण रघुवीर खेडकर, मुली अनिता, अलका, मंदाराणी, नातू मोहित व अभिजित, नातसून अमृता, नात पूजा, जावई दीपकराव मेंगजी, गोतान्बर सौन्दाडेकर, राजेश खोल्लम असा संपूर्ण परिवार तमाशा रंगभूमीवर कार्यरत आहे.