शरद पवार यांची घेतली कुलगुरूंनी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:18 AM2021-03-22T04:18:33+5:302021-03-22T04:18:33+5:30
राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ शरद ...
राहुरी : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण कार्याबद्दल चर्चा केली.
या चर्चेत त्यांनी कृषी क्षेत्रापुढील आव्हानांचा सामना करण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या कोणत्या योजना असतील तसेच दृष्टी, आराखडा काय असेल, याबाबत त्यांचे मार्गदर्शन घेतले. केंद्र शासनाकडील कृषी विद्यापीठाचे प्रश्न सोडविण्यासाठी शरद पवार यांनी कुलगुरू डॉ. पाटील यांना नवी दिल्लीत संबंधित केंद्रीय मंत्र्यांबरोबर बैठक आयोजन करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी कुलगुरू डॉ. पाटील यांनी कृषी महाविद्यालय, पुणे व कृषी महाविद्यालय, धुळे येथील जमीन हस्तांतरण आणि शासनाकडून मिळालेला मोबदला याबाबत चर्चा केली. त्याचबरोबर कृषी विद्यापीठांमधील रिक्त पदे, संशोधनासाठी निधी याबाबतही खासदार शरद पवार यांचे लक्ष वेधले.
कुलगुरू डॉ. पाटील यांनी कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांची भेट घेऊन बारामती कृषी महाविद्यालयाला भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांची अधिस्वीकृती मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी झालेल्या चर्चेमध्ये इन्क्युबेशन सेंटर स्थापनेसंबंधी तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर सामंजस्य करार करून शास्त्रज्ञांचा आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमांमधील सहभाग वाढविण्यात येईल, असे कुलगुरू पाटील यांनी सांगितले. कुलगुरू पी. जी. पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील मळद येथील शेतकरी उत्पादक कंपनीच्या १३० एकर डाळिंब शेतीला भेट दिली. यावेळी कृषिभूषण अंकुश पडवळे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले.
...,
२१पवार-कुलगुरू भेट
...
ओळी-महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी दोघांनी कृषीविषयक चर्चा केली.