जामखेडमध्ये महिलेवर वार करून तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 07:30 PM2018-01-21T19:30:48+5:302018-01-21T19:30:53+5:30
शहरातील कान्होपात्रा भागात महिलेवर चाकूने वार करून नंतर स्वत: त्याच घराच्या छताच्या हुकाला साडीने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली
जामखेड : शहरातील कान्होपात्रा भागात महिलेवर चाकूने वार करून नंतर स्वत: त्याच घराच्या छताच्या हुकाला साडीने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली. जखमी महिला अत्यवस्थ असून, तिच्यावर नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी रात्री ही घटना घडली.
शहरातील कान्होपात्रा येथील एका महिलेच्या घरात पहाटे सहा वाजण्यापूर्वी नितीन धोंडे (पूर्ण नाव नाही, वय ३४, रा. आष्टी, जि. बीड) यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. शुभांगी हिच्यावर चाकूने वार झाल्याने ती गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. नितीन धोंडे याने सदर तरुणीवर वार करून व नंतर त्याच घरात स्लँबच्या हुकाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती पोलीस चौकशीत समोर आली. गंभीर जखमी झालेल्या शुभांगीवर जामखेड ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून नंतर तिला पुढील उपचारासाठी नगरला हलविले. याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
मयत नितीन धोंडे याच्या मृतदेहाचे जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. आष्टी येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक पोकळे, पोलीस हेड. काँस्टेबल बापूसाहेब गव्हाणे करत आहेत. मयत नितीन धोंडे खासगी गुत्तेदार म्हणून काम करत होता, अशी माहिती मिळाली. घटनेचे निश्चित कारण अद्याप समजले नाही, असे पोलिसांनी सांगितले.