धामणगाव देवीचे येथे तरुणांच्या तिसऱ्या आघाडीचा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:20 AM2021-01-22T04:20:21+5:302021-01-22T04:20:21+5:30
तिसगाव : धामणगाव देवीचे (ता.पाथर्डी) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत तरुणांनी एकत्र येऊन केलेल्या तिसऱ्या आघाडीने विजय मिळविला. बंदुक्याफेम अभिनेते व ...
तिसगाव : धामणगाव देवीचे (ता.पाथर्डी) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत तरुणांनी एकत्र येऊन केलेल्या तिसऱ्या आघाडीने विजय मिळविला. बंदुक्याफेम अभिनेते व मुंबई येथील व्यावसायिक नवनाथ जालिंदर काकडे यांनी या पॅनलचे नेतृत्व केले.
महामारी व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीमुळे काकडे हे मार्च महिन्यापासून धामणगाव देवी या त्यांच्या मूळ गावी आले होते. अशातच निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली. त्यांनी शालेय मित्र व गावातील तरुणाईला विकासाची नवी दिशा दाखवीत निवडणूक लढवायचीच या मुद्द्यावर एकत्रित केले. काकडे व पोटे घराणे हे येथील पारंपरिक गट आहेत. या दोन गटातीलच फेरपालटाने येथील सत्ता राहिली आहे. यावेळीही हेच दोन गट रिंगणात होते. अभिनेते नवनाथ काकडे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष भाऊसाहेब मरकड हनुमान पवार आदींसह शेकडो एका विचारांच्या तरुणांनी जय भवानी ग्रामविकास आघाडीचा पर्याय दिला.
दारू, जेवणावळी, पैसा वाटप या बाबींना त्यांनी फाटा दिला. मुख्य गावठाण, विखुरलेली वस्ती, आदिवासींचे तांडे येथील मतदारांना भूमिका सांगितली. येथील छोटेखानी सभांमध्ये नवनाथ काकडे अभिनय कौशल्याने छाप पाडीत असत. मतदारांची जुळवणी होत गेली. टीकेसह थिल्लर समजल्या जाणाऱ्या या आघाडीने रामकिसन काकडे, भास्करराव पोटे या दोन माजी सरपंचांना धोबीपछाड दिली. मावळते सरपंच पोटे यांच्या मंडळास तीन जागांवर समाधान मानावे लागले.
कोट..
मी स्वतः निवडणुकीत उभा राहिलो नाही. रखडलेला गावचा विकास हेच आमचे खरे ध्येय हा नारा दिला. अबालवृद्धांनी साद दिली. अनिता काळे, विठ्ठल कुटे, सुवर्णा काकडे, शालन जायभार, ज्योती गिरी, शिवाजी काकडे असे आघाडीचे सहा उमेदवार विजयी झाले. हा सार्वत्रिक विश्वासाचा विजय आहे.
-नवनाथ काकडे,
अभिनेते
फोटो : २१ धामणगाव देवी
धामणगाव देवी येथील तिसऱ्या आघाडीतील विजयी उमेदवार.