Vidhan Sabha 2019 : नागवडेंच्या भाजप प्रवेशासाठी विखेंची व्यूव्हरचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 06:48 PM2019-09-26T18:48:20+5:302019-09-26T18:49:28+5:30
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या भाजप प्रवेशासाठी खासदार डॉ. सुजय विखे यांनी व्यूव्हरचना आखल्याचे समजते.
बाळासाहेब काकडे
श्रीगोंदा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या भाजप प्रवेशासाठी खासदार डॉ. सुजय विखे यांनी व्यूव्हरचना आखल्याचे समजते. यासाठी त्यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनाही विश्वासात घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे समर्थक त्यांच्यापासून दूर जाणार असे चित्र आहे.
बुधवारी राहाता येथे डॉ. सुजय विखे यांनी श्रीगोंद्यातील भगवानराव पाचपुते, सदाशिव पाचपुते, अनिल पाचपुते, बाळासाहेब नाहाटा, बाळासाहेब गिरमकर, विठ्ठलराव काकडे यांच्या उपस्थितीत पहिली बैठक झाली. या बैठकीत नागवडेंच्या भाजप प्रवेशाविषयी चर्चा झाल्याचे समजते. विखे यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते व राजेंद्र नागवडे यांना एकत्र बसवून त्यांच्या प्रवेशाबाबत चर्चा करावी. आमची काहीच हरकत नाही, असे श्रीगोंद्यातील नेते यावेळी म्हणाल्याचे समजते.
नागवडे यांनी भाजप प्रवेश केल्यास श्रीगोंद्याच्या निवडणूक आखाड्यात ४९ वर्षानंतर पाचपुते-नागवडे हे एकाच पक्षात दिसणार आहेत. स्व. शिवाजीराव नागवडे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त नागवडे कारखाना विश्रामगृहावर माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी खासदार विखे व नागवडे यांच्यात चर्चा घडवून आणली होती. विधानसभा निवडणुकीत पाचपुतेंना मदत आणि नागवडे साखर कारखाना निवडणुकीत नागवडेंना मदत करण्याच्या मुद्यावर दोन्ही गटाचे मनोमिलन होणार असल्याचे समजते. मात्र दोन दिवसात सर्व राजकिय वाटाघाटी झाल्यानंतर अंतिम निर्णय होणार असल्याची चर्चा आहे.