विधानसभा निवडणूक निकाल : अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी सातवे आसमां पर, भाजपा अडली दोन जागांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 09:21 AM2019-10-24T09:21:04+5:302019-10-24T09:28:57+5:30
विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड, पारनेर, शेवगाव, अहमदनगर, राहुरी, अकोले, कोपरगाव मतदारसंघातून पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. श्रीरामपूर मतदार संघातून काँग्रेस तर शिर्डी, श्रीगोंद्यात भाजप आघाडीवर आहे.
अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड, पारनेर, शेवगाव, अहमदनगर, राहुरी, अकोले, कोपरगाव मतदारसंघातून पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. श्रीरामपूर मतदार संघातून काँग्रेस तर शिर्डी, श्रीगोंद्यात भाजप आघाडीवर आहे.
कर्जत-जामखेड मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार ४ हजार ३०० मतांनी तर पारनेर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी दुस-या फेरीत १२०० मतांनी आघाडीवर आहेत. शेवगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे, अहमदनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे ६५९ मतांनी आघाडीवर आहेत. राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे आघाडीवर आहेत. कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आशुतोष काळे ४०० मतांनी आघाडीवर आहेत. शिर्डीतून भाजपचे राधाकृष्ण विखे यांनी जवळपावस चार हजार मतांची आघाडी घेतली आहे.
नेवासा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे (अपक्ष) उमेदवार शंकरराव गडाख हे आघाडीवर आहेत. श्रीगोंद्यातून भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते हे पहिल्या फेरीत ११७५ मतांनी आघाडीवर आहेत. श्रीरामपूरमधून काँग्रेसचे लहू कानडे हे आघाडीवर आहेत. अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. किरण लहामटे हे दुस-या फेरीत ५५०० मतांनी आघाडीवर होते. तर भाजपचे आमदार वैभव पिचड हे पिछाडीवर होते.