शिर्डीतील नियोजित कोविड रुग्णालयाला विखे यांनी पाठिंबा द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:22 AM2021-05-20T04:22:47+5:302021-05-20T04:22:47+5:30
श्रीरामपूर येथे पवनपुत्र कोविड रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी बुधवारी सायंकाळी खासदार लोखंडे बोलत होते. यावेळी नाशिक म्हाडाचे अध्यक्ष शिवाजी ढवळे, ...
श्रीरामपूर येथे पवनपुत्र कोविड रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी बुधवारी सायंकाळी खासदार लोखंडे बोलत होते. यावेळी नाशिक म्हाडाचे अध्यक्ष शिवाजी ढवळे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, भाजपचे प्रकाश चित्ते, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, अशोक थोरे, डॉ. दिलीप शिरसाठ, लकी सेठी, बाबासाहेब शिंदे उपस्थित होते.
शिर्डीमध्ये चार हजार २०० बेडसचे कोविड रुग्णालय उभारणीसाठी खासदार लोखंडे हे प्रयत्नशील आहेत. त्याकरिता त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तत्त्वतः मान्यता घेतली आहे. धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीसाठी त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे. मात्र शिर्डीतील भाजप पदाधिकाऱ्यांनी या रुग्णालयास विरोध केला आहे. त्याऐवजी प्रत्येक तालुक्यात पाचशे बेडसचे रुग्णालय करावे अशी मागणी त्यांनी नुकतीच केली आहे.
लोखंडे म्हणाले, साईबाबा यांनी आयुष्यभर रुग्णांची सेवा केली. जगभरातील भाविकांचे दान संस्थानला प्राप्त होते. त्यातून भव्य असे रुग्णालय येथे सुरू व्हावे अशी आपली इच्छा आहे. त्यातून जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना कोविडवर मोफत उपचार मिळू शकतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही त्यासाठी तत्त्वतः मान्यता घेतली आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे यांनी रुग्णालयास पाठिंबा द्यावा. राजकारण करण्याची ही वेळ नाही, पुढील काळात आपण राजकारण करू. मात्र आता गोरगरिबांसाठी रुग्णालयास मान्यता द्यावी अशी मागणी लोखंडे यांनी केली.
खासदार लोखंडे हे बोलत असताना शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी रुग्णालयास आपला कोणताही विरोध नसल्याचे सांगितले. मात्र त्यावर खासदार लोखंडे यांनी आपण तुमच्या समवेत विखे यांना भेटू असे स्पष्ट केले. यावेळी राज्याचे विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी रुग्णालय सुरू झाल्याने समाधान व्यक्त केले. त्यांनी शहरातील हनुमान मंदिर ट्रस्टने रुग्णालयासाठी केलेल्या मदतीबद्दल यावेळी ऑनलाइन संदेशात शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास नगरसेवक किरण लुणिया, दीपक चव्हाण, वैशाली चव्हाण, सरपंच महेंद्र साळवी, अभिजित कुलकर्णी आदी उपस्थित होते.