कर्जतमध्ये विखेंकडून पवारांना धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:15 AM2021-02-22T04:15:01+5:302021-02-22T04:15:01+5:30
अहमदनगर: जिल्हा सहकारी बँकेच्या चुरशीच्या झालेल्या कर्जत विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून विखे गटाचे अंबादास पिसाळे हे एका मताने विजयी ...
अहमदनगर: जिल्हा सहकारी बँकेच्या चुरशीच्या झालेल्या कर्जत विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून विखे गटाचे अंबादास पिसाळे हे एका मताने विजयी झाले आहेत. रोहित पवार यांनी काँग्रेसच्या मीनाक्षी सांळुंके यांच्या पाठीमागे मोठी ताकद उभी केली होती. परंतु, खासदार डॉ. सुजय विखे यांनी राजकीय खेळी करत पवार यांना मोठा धक्का दिला. हा एकप्रकारे पवार यांचाच पराभव असून, विधानसभेनंतर पवार यांना पहिल्यांदाचपरभावाचा सामना करावा लागला.
जिल्हा सहकारी बँकेच्या कर्जत तालुका विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघात विखे यांचे समर्थक अंबादास पिसाळ यांना ३७, तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश साळुंके यांच्या पत्नी मीनाक्षी साळुंके यांना ३६ मते मिळाली. महाविकास आघाडीकडून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे बँकेच्या निवडणूकीची सूत्रे हेाती. त्यांनी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या काळे- कोल्हे आणि मुरकुटे -ससाणे यांच्यात समझोता घडवून आणला. परंतु, त्यांचे समर्थक व पक्षाचे जिल्हाध्यक्ष साळुंके यांना कर्जतमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात. जामखेडचे विखे समर्थक असलेले अमोल राळेभात यांना बिनिवरोध करण्यात पवार यांनी महत्वाची भूमिका बजावली. तशी त्यांनी साळुंके यांच्यापाठीमागेही ताकद उभी केली. पवार यांच्याकडून ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. बारामतीतून सूत्रे हलली. कर्जत तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीचे ४५ मतदार पवार यांच्या बारामतीत मुक्कामी हाेते, अशी कर्जतमध्ये चर्चा आहे. असे असताना साळुंके यांना ३६ च मते मिळाली. खासदार डॉ. सुजय विखे हे संसदेच्या अधिवेशानात व्यस्त होते. अधिवेशन संपल्यानंतर विखे यांनी कर्जतमध्ये तळ ठोकला होता. जामखेडचे राळेभात बिनविरोध झाल्याने विखे व पवार यांनी जिल्हा बँकेत जुळवून घेतल्याची चर्चा राजकीय वतुर्ळात होती. परंतु, कर्जतमध्ये या दोघांमध्ये कडवा संघर्ष पाहायला मिळाला. अखेर सुजय विखे यांनी पिसाळ यांना थोड्याफार मताने का होईना पण, निवडून आणलेच. महाविकास आघाडीला मात्र या तालुक्यात पराभवाचा सामना करावा लागला. राष्ट्रवादीची या तालुक्यात ताकद आहे. अर्थातच या तालुक्यातील जिल्हा बँकेची जबाबदारी राष्ट्रवादीवरच होती. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेेंद्र फाळके हेही कर्जत तालुक्यातीलच आहेत. आ. रोहित पवार व फाळके यांनी साळुंके यांच्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. परंतु, त्यांना आपला उमेदवार निवडून आणण्यात अपयश आल्याने महाविकास आघाडीची एक जागा कमी झाली.
....
कर्जत नगरपरिषदेवर परिणाम
कर्जत नगरपरिषदेची निवडणूक तोंडावर आहे. ही निवडणूक तोंडावर असतानाच कर्जत तालुक्यात जिल्हा बँकेत राष्ट्रवादीला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे पवार यांच्या वर्चस्वाला धक्का बसला असून, त्याचे पडसाद नगरपरिषदेच्या निवडणुकीतही पाहायला मिळतील. याचा अर्थ पवारांची एकहाती सत्ता कर्जतकरांनाही मान्य नसल्याचेच या निकालातून स्पष्ट होते.