गाव नाही अख्खा नगर तालुका दत्तक घेतोय : खासदार सुजय विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 07:08 PM2019-06-07T19:08:01+5:302019-06-07T19:08:07+5:30
नगर तालुका टंचाई आढावा बैठकीसाठी प्रशासनाच्या यादीत निमंत्रित असलेल्या पाचही आमदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.
योगेश गुंड
केडगाव : नगर तालुका टंचाई आढावा बैठकीसाठी प्रशासनाच्या यादीत निमंत्रित असलेल्या पाचही आमदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. तीन आमदारांचा तालुका असलेल्या नगर तालुका टंचाई बैठकीत दांडी मारली. नगर तालुक्याला हक्काचा आमदार नसल्याने त्यांची भिस्त आता खासदारावर आहे म्हणून नगर तालुका मी दत्तक घेत असल्याची घोषणा खासदार डॉ. सुजय विखे यांनी केली.
नगर तालुका टंचाई आढावाबैठक आज नगर शहरात डॉ सुजय विखे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी सभापती रामदास भोर, माजी आमदार बबनराव पाचपुते, माजी जि.प.सदस्य बाळासाहेब हराळ, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, गोविंद मोकाटे, शरद झोडगे, तहसीलदार उमेश पाटील, गटविकास अधिकारी वसंत गारुडकर, पंचायत समिती सदस्य विठ्ठल काळे, दिलीप पवार, गुलाब शंदे, रविंद्र भापकर आदी उपस्थित होते.
बैठकीस तालुका प्रशासनाने आमदार शिवाजी कर्डिले, विजय औटी, अरुण जगताप, राहुल जगताप, संग्राम जगताप या पाच आमदारांना निमंत्रित केले होते. त्यांची नावे फलकावर प्रमुख उपस्थितामध्ये टाकण्यात आली मात्र यापैकी कोणीच या बैठकीस उपस्थित राहिले नाही. हाच धागा पकडून डॉ.सुजय विखे म्हणाले, नगर तालुक्याला स्वतंत्र आमदार नाही. यामुळे तालुक्याची सगळी भिस्त आता खासदारावर आहे. मी सरकारी योजनेप्रमाणे गाव दत्तक घेत नसतो तर संपूर्ण तालुकाच दत्तक घेणारा खासदार आहे. यामुळे यापुढे नगर तालुका मी दत्तक घेत आहे.
नगर तालुक्यातील ४४ गावांची बु-हाणनगर पाणी योजना जनसेवा फौंडेशनला चालवण्यास देणार आहे. यामुळे या योजनेच्या तांत्रिकदृष्ट्या होणा-या चुका पुन्हा पुन्हा होणार नाही.
ज्या गावाने मला सर्वोच्च मताधिक्य दिले. त्या गावाला तीन महिन्यात १५ लाखांचा विकास निधी देणार असून मताधिक्याच्या टक्केवारीनुसार गावांना निधी देण्यास प्राधान्य देणार आहे. छावणी चालकांना झालेला दंड कमी करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री यांना भेटणार आहे. दुष्काळ अनुदानासाठी १० दिवसाची मुदत वाढ देण्यात आली.सरपंच ग्रामसेवक तलाठी यांची आता जबाबदारी वाढली त्यांनी यात लक्ष घालावे असेही खासदार विखे म्हणाले.
काम न केलेल्यांची यादी खिशात घेऊन फिरतोय
डॉ. सुजय विखे म्हणाले, नगर तालुक्याने मला मोठे मताधिक्य दिले. प्रत्येक गावात माझा माणूस होता. त्यामुळे कोणी काम केले आणि कोणी काम केले नाही यांचा रिपोर्ट मी बंद पाकिटात घेऊन फिरत आहे. उन्हातान्हात फिरलेल्यांची यादी माझ्याकडे आहे. यामुळे कोणी श्रेयवादाच्या लढाईत पडू नका.