गावच्या तक्रारी पोलीस ठाण्यात; तंटामुक्ती कागदावरच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:19 AM2021-03-28T04:19:18+5:302021-03-28T04:19:18+5:30
अहमदनगर : गावात निर्माण झालेले वाद लोकसहभागातून गावातच मिटावेत, तसेच ग्रामस्तरावर सामाजिक सलोखा निर्माण होऊन सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी ...
अहमदनगर : गावात निर्माण झालेले वाद लोकसहभागातून गावातच मिटावेत, तसेच ग्रामस्तरावर सामाजिक सलोखा निर्माण होऊन सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी या उद्देशातून १९ जुलै २००७ रोजी राज्यात सुरू करण्यात आलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम गेल्या चार वर्षांपासून ठप्प आहे. गावपातळीवरील छोट्या-मोठ्या तक्रारीही आता थेट पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत.
तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या संकल्पनेतून राज्यात २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू करण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात जिल्ह्यासह राज्यभरात ही मोहीम यशस्वी झाली. या मोहिमेला राज्यात लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले होते. गेल्या काही वर्षांत मात्र शासनासह प्रशासकीय यंत्रणेलाही या मोहिमेचा विसर पडला आहे. जिल्हास्तरावर पोलीस आणि महसूल प्रशासनाकडून काहीच कारवाई होत नसल्याने समाजहितासाठी राबविलेली ही मोहीम सध्या कागदावरच आहे. गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यातील गावांचे प्रशासनाकडून मूल्यमापन झालेले नाही. त्यामुळे मोहिमेत कार्यरत असलेल्या तंटामुक्त समित्यांकडूनही पहिल्यासारखे काम होताना दिसत नाही. आता गावपातळीवरील रस्ता अडविणे, जमिनीचे वाद, बांधावरून होणारी भांडणे, झाडे तोडणे आदी कारणांवरून वाद होऊन थेट पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल होत आहेत.
..............
आदेश नाही, प्रचार प्रसिद्धीही नाही
राज्यस्तरीय समितीने दरवर्षी या मोहिमेचा आढावा घेऊन आवश्यक ते बदल करणे, मोहिमेचा प्रचार व प्रसिद्धीसाठी नियोजन करणे, मूल्यमापनाचे निकष ठरविणे आदी जबाबदाऱ्या आहेत. गेल्या चार वर्षांत मात्र यातील काहीच कार्यवाही झालेली नाही. ज्या गावांमध्ये तंटामुक्ती समिती प्रामाणिकपणे काम करते त्यांचे मूल्यमापन न झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
.........
चांगले काम करणाऱ्या गावांना प्रोत्साहनाची गरज
..............
जिल्ह्यातील अनेक गावांत तंटामुक्ती समित्या कार्यरत असून, त्यांचे कामही चांगले आहे. या गावांचे प्रशासनाने मूल्यमापन करून पहिल्यासारखेच त्यांना बक्षीस देऊन प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
.........
शासन पातळीवरून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षभरात इतर कामांची जबाबदारी असल्याने स्थानिक पातळीवरील समित्यांकडून काम झाले नाही, तसेच गावांचे मूल्यमापनही झाले नाही.
-अर्चना भाकड, तहसीलदार शेवगाव
..........
चिचोंडी पाटील येथे तंटामुक्ती समितीचे काम सुरू आहे. गावात आलेल्या अर्जांवर बैठक घेऊन स्थानिक पातळीवरच वाद सोडविण्याचे प्रयत्न केले जातात. मोहिमेंतर्गत मात्र गावाचे प्रशासनाकडून मूल्यमापन होत नाही.
-अमित बोरा, अध्यक्ष तंटामुक्त गाव समिती, चिचोंडी पाटील ता. नगर.