गावाने दु:ख केले हलके
By Admin | Published: December 22, 2015 11:02 PM2015-12-22T23:02:18+5:302015-12-22T23:11:02+5:30
श्रीरामपूर : विलास रभाजी पटेकर हा ४७ वर्षीय शेतकरी कांदा लागवड करताना हृदयविकाराचा झटका येऊन मरण पावला. अन् त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
श्रीरामपूर : विलास रभाजी पटेकर हा ४७ वर्षीय शेतकरी कांदा लागवड करताना हृदयविकाराचा झटका येऊन मरण पावला. अन् त्याच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. आई देऊबाई, वडील रभाजी, पत्नी सोनाली, सिया व समीक्षा या दोन चिमुकल्या मुली पोरक्या झाल्या. निर्मलग्राम वडगाव आमलीने हे दु:ख एका कुटुंबाचे न मानता अख्ख्या गावाचे मानून हे दु:ख हलके केले.
कोरडेपणाने निव्वळ प्रतिमेला फुले वाहून, श्रद्धांजली वाहून गावकरी थांबले नाहीत. त्यांनी मृत शेतकरी विलासच्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षणासाठी उत्स्फूर्तपणे सुमारे १ लाख रुपयांची लोकवर्गणी जमा केली. हागणदारीमुक्त गाव व निर्मलग्रामचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळविलेल्या वडगाव आमली (ता. पारनेर) येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक रभाजी पटेकर यांचा विलास हा एकुलता एक मुलगा. कांद्याची लागवड करताना छातीत दुखू लागले. कामामुळे चमक भरली असेल म्हणून दोघे नवरा- बायको भाळवणीला दवाखान्यात निघाले. मध्येच एक मोटारसायकलस्वार भेटला. त्याने या दोघांना दवाखान्यात पोहोचविले. डॉक्टरांनी तपासले. हृदयविकाराचा झटका असल्याने नगरला हलविण्यासाठी रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिका बोलावण्यापूर्वीच दुसरा झटका आला. अन् संपूर्ण पटेकर कुटुंबालाच विलासने अखेरचा झटका देत जगाचा निरोप घेतला. आई आजारी बहिणीला भेटायला मुंबईला गेली होती. त्यांच्यासह दूरवरच्या नातलगांना निरोप गेले. मुंबईवाले येता येता पहाटेचे ३ वाजले. आई, बहीण पहाटे ३.३० वाजता पोहोचले. पहाटेच्या कुडकुडत्या थंडीत पाहुणे वाट पाहत होते. कोणी शेकोटीचा आधार घेत होते. कोणी सोबतच्या पांघरुणात ऊब शोधत होते. पहाटे ४ च्या सुमारास विलासवर अंत्यसंस्कार झाले. नंतर जलदान विधी (दशक्रिया) झाला. हनुमान मंदिरात अख्खा गाव जमला होता.
कार्यक्रमाचं नियोजन सारं गावानेच हाती घेतलं होतं. पटेकर गुरूजींना न सांगता गावानेच अन्नदानाची सोय केली होती. श्रद्धांजलीची भाषणं सुरू झाली. गावातल्या एका ज्येष्ठाने कल्पना मांडली. उपस्थितांनी आपापल्या परीने पटेकर कुटुंबाला नाही तर विलासच्या दोन चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करावी. पाहता पाहता सुमारे १ लाख रुपयांचा निधी जमा झाला. गावातील ज्येष्ठ नागरिक, पेन्शनर, नोकरदार, शेतकरी, महिला अशा साऱ्यांनीच यात खारीचा सहभाग दिला. ही रक्कम विलासच्या सिया व समिक्षा या दोन मुलींच्या नावावर बँकेत एफ. डी. केली जाणार आहे. गावाने एका परिवाराचे दु:ख हलके करताना दु:खाच्या घटनेतूनही समाजासमोर आदर्श निर्माण केला.
(प्रतिनिधी)