श्रीरामपुरात गावचे प्रश्न आणि गावचेच नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:50 AM2021-01-13T04:50:11+5:302021-01-13T04:50:11+5:30
शिवाजी पवार श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये तालुक्यातील बड्या राजकीय नेत्यांचे अस्तित्व केवळ पत्रके आणि फलकांपुरतेच मर्यादित ...
शिवाजी पवार
श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये तालुक्यातील बड्या राजकीय नेत्यांचे अस्तित्व केवळ पत्रके आणि फलकांपुरतेच मर्यादित राहिले आहे. गावच्या कारभारी निवडीमध्ये नेत्यांचा कोणताही हस्तक्षेप येथे दिसून आला नाही. गावचे प्रश्न आणि गावचे नेतृत्व याच बळावर निवडणुका लढविल्या जात असून नेेते मात्र केवळ आधारस्तंभ आणि खंबीर साथ यापुरतेच उरले आहेत.
कोणत्याही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत तालुका पातळीवरील बड्या नेत्याने सहभाग नोंदविलेला नाही. माजी आमदार भानुदास मुरकुटे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे हे निवडणुकीपासून लांब राहिल्याचे चित्र आहे. काँग्रेसचे आमदार लहू कानडे यांनी प्रारंभीच ग्रामसभांना मिळालेल्या अधिकारांचा वापर करत बिनविरोध निवडणुकांचा आग्रह धरला होता. भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे यांनीही आपल्या समर्थकांना बिनविरोध निवडणुका करण्याचे सूचित केले होते.
मात्र असे असले तरी केवळ खानापूर येथील निवडणूक बिनविरोध पार पडली. अन्य २६ ग्रामपंचायती मात्र सर्वत्र चुरशीने लढविल्या जात आहेत. मात्र त्यात नेत्यांचा कोणताही हस्तक्षेप नाही. पूर्वी उमेदवारी वाटपामध्ये नेत्यांच्या शब्दाला महत्त्व होते. गावची निवडणूक स्थानिक कोणत्या नेत्याच्या नेतृत्वाखाली लढवावी, याचेही निर्देश ते देत होते.
ग्रामपंचायत निवडणुकीकडे कार्यकर्ता निर्माण करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून नेते मंडळी पाहत होती. आता मात्र स्थानिक कार्यकर्त्यांच्याच हवाली सर्व सूत्रे देण्यात आली आहेत. कार्यकर्त्यांनीही आपल्या सोयीनुसार गावात आघाड्या केल्या आहेत.
-----------
प्रतिमा जपण्याचा प्रयत्न
ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केल्यास तालुक्यातील बड्या नेत्यांना आरोप प्रत्यारोपाला सामोरे जावे लागते. त्यातून प्रतिमेला धक्का बसण्याची भीती असते. त्यामुळे नेते निवडणुकीपासून दूर आहेत. तालुक्याच्या राजकारणात सर्वमान्य नेतृत्वाचा मोठा अभाव आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये हस्तक्षेप करून आपला शिक्का चालेल याचीही त्यांना शाश्वती नाही. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांनी राजकीय सोय पाहून झेंडे हाती घेतले आहेत.
----------