गावोगावी दिव्यांगांचे सर्वेक्षण करून लाभ देणार; आ. बच्चू कडू यांची ग्वाही
By चंद्रकांत शेळके | Published: September 12, 2023 06:56 PM2023-09-12T18:56:34+5:302023-09-12T18:57:18+5:30
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियान
अहमदनगर : राज्यात पहिल्यांदाच दिव्यांग मंत्रालयाची स्थापना झालेली आहे. त्यामुळे एकही दिव्यांग योजनेपासून वंचित राहणार नाही. गावोगावी तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडीसेविका यांच्यामार्फत दिव्यांगांचे सर्वेक्षण करून आवश्यक तो लाभ देण्याचे काम केले जाईल, असे आश्वासन दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष आ. बच्चू कडू यांनी दिले.
राज्यात नवीनच स्थापन झालेल्या दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांगांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्यांचा तातडीने निपटारा करण्यासाठी ‘दिव्यांग विभाग दिव्यांगांच्या दारी’ हे अभियान राज्यात राबविण्यात येत आहे. मंगळवारी अहमदनगर जिल्ह्यात या अभियानांतर्गत दिव्यांगांचा मेळावा केडगावमधील निशा लाॅन येथे आयोजित केला होता. आमदार तथा अभियानाचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे अभियान झाले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी आदी उपस्थित होते.
आ. बच्चू कडू म्हणाले, दिव्यांगांच्या कल्याणासाठी आपण गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने काम करत आहे. दिव्यांगांना प्रश्न घेऊन प्रत्येक शासकीय कार्यालयात येणे शक्य होत नसल्याने 'दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी' हे अभियान राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांना यूडीआयडी ओळखपत्र व आधार ओळखपत्र मिळण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. मूकबधीर मुलांच्या शाळांकडे विशेष लक्ष देताना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत. दिव्यांगांना शासनाच्या कोणत्या लाभाची आवश्यकता आहे हे पाहण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडीसेविका यासारख्या ग्रामस्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षणाचे काम गतीने पूर्ण करण्यात यावे व त्यांना आवश्यक शासकीय योजनांचा लाभ द्यावा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी आ. बच्चू कडू यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना प्रातिनिधिक स्वरूपात शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. कार्यक्रमाला विविध विभागांचे अधिकारी, दिव्यांग संघटनांचे पदाधिकारी आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एक दिवस दिव्यांगांसाठी राखीव ठेवा
बच्चू कडू म्हणाले, हे अभियान केवळ कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता प्रशासनाने दिव्यांगांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेत आठवड्यातील एक दिवस राखीव ठेवावा.