नगर तालुक्यात गाव तेथे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:20 AM2021-05-10T04:20:23+5:302021-05-10T04:20:23+5:30

केडगाव : प्राथमिक आरोग्य केंद्रात होणारी गर्दी, लांबलचक रांगा, गडबड, गोंधळ, लसीचा तुटवडा यातून निर्माण होणाऱ्या संतप्त भावना यातून ...

Village vaccination in Nagar taluka | नगर तालुक्यात गाव तेथे लसीकरण

नगर तालुक्यात गाव तेथे लसीकरण

केडगाव : प्राथमिक आरोग्य केंद्रात होणारी गर्दी, लांबलचक रांगा, गडबड, गोंधळ, लसीचा तुटवडा यातून निर्माण होणाऱ्या संतप्त भावना यातून सुटकारा मिळविण्यासाठी नगर तालुक्यात गाव तेथे लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. लसीकरणात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न आहे.

तालुक्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांचा उच्चांक झाला आहे. बाधितांची संख्या १२ हजारांच्या घरात गेली आहे. त्यामुळे प्रत्येकजण लस घेण्यासाठी आटापिटा करीत आहे. दिवसभर रांगेत थांबूनही लस मिळत नसल्याने अनेकजण या लसीकरणाच्या नियोजनाला वैतागले आहेत. तालुक्यात ९ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. सध्या आरोग्य केंद्रनिहाय लसीकरण सुरू होते. एका केंद्रात १० ते १२ गावांचा समावेश होतो. यामुळे लसीकरणासाठी एवढ्या गावातील लोकांची गर्दी होत असते. लसींचा मर्यादित पुरवठा व लसीकरणासाठी होणारी मोठी गर्दी यामुळे लसीकरणाचे नियोजन कोलमडत आहे.

काही ठिकाणी नोंदणी पद्धत सुरू केली. मात्र, तीही अयशस्वी झाली. नंतर टोकन पद्धत सुरू करण्यात आली. त्यातही वशिलेबाजीचा आरोप झाल्याने ती पद्धतही आता बंद पडली.

यावर उपाय म्हणून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे पदाधिकारी व सदस्य यांनी नुकतीच शासकीय विश्रामगृहावर जिल्हाधिकारी, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेतली. यात लसीकरण मोहिमेत सुसूत्रता आणण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात यावर चर्चा झाली. यात गाव तेथे लसीकरण मोहीम राबवून तालुक्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याची सूचना जि. प. सदस्य संदेश कार्ले, सभापती सुरेखा गुंड, उपसभापती दिलीप पवार व इतर पदाधिकाऱ्यांनी मांडली. त्यास प्रशासनाने होकार दिला. तसे नियोजन करण्यात आले.

दोन दिवसांपासून तालुक्यात गावनिहाय लसीकरण सुरू करण्यात आले आहे. यामुळे प्रत्येक केंद्रातील दोन गावांत पूर्ण लसीकरण होत आहे. यानुसार तालुक्यात दररोज २० गावांत लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. लस उपलब्ध होते तसे नियोजन करण्यात येत आहे.

---

तालुक्यात नोंदणी पद्धत, टोकन पद्धत यशस्वी ठरली नाही. यामुळे आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला गावनिहाय लसीकरण मोहीम सुरू करण्याची सूचना केली. ती प्रशासनाने मान्य केली असून आता तालुक्यात प्रत्येक गावात टप्प्याटप्प्याने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

-संदेश कार्ले,

जि. प. सदस्य.

Web Title: Village vaccination in Nagar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.