अहमदनगर जिल्ह्यात दिव्यांगांचे होणार गावनिहाय सर्वेक्षण; जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची माहिती
By साहेबराव नरसाळे | Published: June 6, 2023 05:32 PM2023-06-06T17:32:13+5:302023-06-06T17:32:26+5:30
शासन आपल्या दारी या अभियानाच्या धर्तीवर “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” हे अभियान राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे
अहमदनगर : जिल्ह्यातील अधिकाधिक दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी दिव्यांग व्यक्तींचे गाव, वाडीनिहाय सर्व्हेक्षण विहित वेळेत पूर्ण करण्यात यावे. या कामामध्ये ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य यंत्रणा तसेच आयसीडीएस यांचा सहभाग घेण्यात यावा. दिव्यांगांच्या अडचणींचे प्राधान्याने निराकरण होईल, यादृष्टीने सर्व अधिकाऱ्यांनी काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
शासन आपल्या दारी या अभियानाच्या धर्तीवर “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” हे अभियान राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी” या अभियानाबाबत पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते. यावेळी महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे, नगरपालिका प्रशासनाचे सहआयुक्त प्रशांत खांडकेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैजनाथ गुरवले, जिल्हा दिव्यांग निर्मूलन केंद्राचे समन्वयक दीपक अनाप आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सालीमठ म्हणाले, दिव्यांगांना दैनंदिन जीवनातील अनेक अडचणींबरोबरच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी वैश्विक ओळखपत्र, शेत जमिनीशी संबंधित कागदपत्रे, जात प्रमाणपत्र यासारखी आवश्यक असणारी प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठीही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दिव्यांगांना आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळावीत यासाठी जिल्हास्तरीय शिबिराच्या आयोजनाचे सर्व विभागांनी एकत्रितपणे व समन्वय साधत काटेकार नियोजन करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. समाजकल्याणचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली.