बेलवंडीत पाण्यासाठी ग्रामस्थांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:18 AM2021-05-30T04:18:36+5:302021-05-30T04:18:36+5:30
बेलवंडी : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडीच्या सरपंच सुप्रिया पवार व ग्रामस्थांनी शुक्रवारी गावातील भैरवनाथ मंदिरात पिण्याच्या पाण्यासाठी उपोषण केले. ...
बेलवंडी : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडीच्या सरपंच सुप्रिया पवार व ग्रामस्थांनी शुक्रवारी गावातील भैरवनाथ मंदिरात पिण्याच्या पाण्यासाठी उपोषण केले. या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने बेलवंडीला सोमवारपासून टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
बेलवंडी गावची लोकसंख्या २० हजार आहे. मात्र एक महिन्यापासून गावाला पिण्याच्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. २ मार्चला ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली होती. मात्र त्यांच्या मागणीकडे तालुका प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यावर सरपंच सुप्रिया पवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संग्राम पवार, सलीम शेख, अजित भोसले, संभाजी बेदरे, संदीप आरकस, मनसुख नहार, सम्यक पवार, नीळकंठ जाधव, सुभाष क्षीरसागर, बाळासाहेब पवार, माधव पवार, संजय शर्मा, दीपचंद वायदंडे, गणपत कांबळे, अंकुश वाळके, बंडू शिकारे यांनी उपोषण केले.
तहसीलदार प्रदीप पवार, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी शुक्रवारी रात्री उपोषणकर्त्यांची भेट घेतली. तहसीलदारांनी सोमवारपासून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर उपोषण सोडण्यात आले.