कामरगावला आगडोंब विझविण्यासाठी धावले गावकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:35 AM2021-02-18T04:35:32+5:302021-02-18T04:35:32+5:30

केडगाव : डोंगराच्या पायथ्याशी सर्व दूर लागलेला वनवा.... ऊर फाटेपर्यंत पळणारे वन्य प्राणी .... पक्ष्यांचा चिवचिवाट. घामाघूम ...

Villagers rushed to Kamargaon to extinguish the fire | कामरगावला आगडोंब विझविण्यासाठी धावले गावकरी

कामरगावला आगडोंब विझविण्यासाठी धावले गावकरी

केडगाव : डोंगराच्या पायथ्याशी सर्व दूर लागलेला वनवा.... ऊर फाटेपर्यंत पळणारे वन्य प्राणी .... पक्ष्यांचा चिवचिवाट. घामाघूम झालेले ग्रामस्थ. सरपंचांनी घेतलेला पुढाकार.... आणि सर्वांच्याच अथक प्रयत्नांना आलेले यश. हा प्रसंग होता..नगर तालुक्यातील कामरगाव येथील डोंगराच्या पायथ्याशी लागलेल्या आगीचा.

कामरगाव येथे मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास गावापासून दोन अंतरावर काहल्याच्या डोंगराच्या पायथ्याशी जानबाचा तलाव ते भैरवनाथ मंदिर दरम्यान अज्ञात व्यक्तीकडून आग लागली. काही वेळातच सुमारे एक हजार मीटर परिघात आगीने रूद्ररूप धारण केले. अंधार असतानाही त्या ठिकाणी लख्ख प्रकाश दिसू लागला. ही बातमी नवनिर्वाचित सरपंच तुकाराम कातोरे यांना समजली. त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. त्यांनी गावातील २५ तरुणांना सोबत घेऊन घटनास्थळाकडे धाव घेतली.

प्रचंड उसळलेला आगडोंब पाहून जंगलातील हरीण, तरस, ससे, मोर, रानडुक्कर हे प्राणी जीवाच्या आकांताने सैरभैर होऊन पळू लागली हे दृश्य मन हेलावून टाकणारे होते.

यावेळी गावातील तरुणांनी ओला बारदाणा, झाडांच्या पानांचे डगळे हाती घेऊन तीन तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. दोन ट्रॅक्टरांनी आगीच्या पुढे खोल नांगरट केली. त्यामुळे आग विझविण्यास आणखी मदत झाली. काहल्याच्या डोंगरावर वनविभागाची शंभर हेक्टरहून अधिक जमीन आहे. आग आटोक्यात आली नसती तर शेकडो प्राणी व वनस्पती जळून खाक झाल्या असत्या. शेतकऱ्यांची ज्वारी, गहू, हरभरा ही उभी पिके जळाली असती त्यामुळे मोठी वित्तहानी झाली असती.

आग विझविण्यासाठी सरपंच तुकाराम कातोरे यांच्यासह भोरवाडीचे उपसरपंच प्रवीण जासूद, संजय ठोकळ, मनोज झरेकर, श्रीराम कातोरे, नवनाथ जासूद, अंकुश जाधव गोकूळ लष्करे, तेजस जाधव, रोहन ठोकळ, छगन साठे, खंडू जासूद, झाकीरभाई, रमेशभाई, विठ्ठल ठोकळ, शुभम कातोरे, वनरक्षक रामचंद्र आडागळे, वन कर्मचारी सखाराम येणारे, महादेव जासूद, संदीप ढवळे, अंकुश ठोकळ, भाऊसाहेब ठोकळ यांनी प्रयत्न केेले.

ग्रामस्थांनी आग विझवून केलेल्या सहकार्यामुळे वनक्षेत्रपाल अधिकारी सुनील थेटे यांनी आभार मानले.

....

वनविभागाने डोंगरावर जाळ पट्ट्या तातडीने करून घ्याव्यात. त्यामुळे जीवित व वित्तहानी होणार नाही. झाडांचे रक्षण होईल.

-वसंत ठोकळ,

माजी सरपंच, कामरगाव, ता. नगर.

Web Title: Villagers rushed to Kamargaon to extinguish the fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.