संगमनेर तालुक्यातील ग्रामस्थांनी अडविले कच-याचे ट्रॅक्टर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 03:39 PM2018-05-23T15:39:19+5:302018-05-23T15:41:23+5:30
वडगाव पान : येथील सर्व्हे नंबर १६१ मधील सहा हेक्टर २२ गुंठे गायरान जमीन संगमनेर कृषि उत्पन्न बाजार समितीने वडगाव पान येथे बाजार उपसमिती सुरु करण्यासाठी राज्य शासनाकडून खरेदी केली होती. मात्र येथे अजून काहीच काम नसल्याने संगमनेर बाजार समितीतील सडका माल गुपचूप आणून टाकण्यास सुरुवात झाल्याने ग्रामस्थांनी बुधवारी कच-याचे ट्रॅक्टर अडविले. संतप्त ग्रामस्थ पाहून येथून ट्रॅक्टर चालकांनी पळ काढला.

वडगाव पानच्या ग्रामस्थांनी परिसरातील नागरिकांचे हित लक्षात घेवून मोठ्या मनाने येथील गायरान जमीन ग्रामसभेचा ठराव घेऊन राज्य शासनाला नाहरकत कळविली. परंतु अचानक सदर जागेत कृषि उत्पन्न बाजार समितीचा सडलेला शेतमाल गुपचूप आणून टाकण्यास सुरुवात केली.ही बातमी वडगाव पान येथील ग्रामस्थांना समजताच बुधवारी ग्रामस्थ संतप्त झाले. सदर जागेत जाऊन गुपचूप आणलेले कच-याचे ट्रॅक्टर पुन्हा मागे परतवून लावले.
नियोजीत कृषि उत्पन्न बाजार उपसमितीच्या नजीकच तळेगाव, वडगाव पान व इतर २० गावांच्या पिण्याचे साठवण तलाव आहे. त्यामुळे भविष्यात हा टाकाऊ कचरा तेथे टाकल्यास भविष्यात योजनेला पुरविले जाणारे पाणी दूषित होईल, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य शिशीर काशिद, गणेश गडगे, बी. के. पवार, निलेश थोरात, संजय थोरात व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जागेचा दुरुपयोग करु देणार नाही
ग्रामपंचायतीने परिसरातील शेतकºयांच्या हितासाठी गावची गायरान जमीन कृषि उत्पन्न बाजार समितीला दिली, परंतु तिचा दुरुपयोग झाल्यास वडगाव पानचे ग्रामस्थ कदापि सहन करणार नाही, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य शिशीर काशीद यांनी दिला. सदर जागेत आणलेल्या ट्रॅक्टर चालकांना ग्रामस्थांनी कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही येथे कच-याचे ट्रॅक्टर आणले, अशी विचारणा ग्रामस्थांनी केली, परंतु त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. ग्रामस्थांचा उग्र अवतार पाहून ट्रॅक्टर चालकांनी तेथून पळ काढला.