लोणी हवेलीचा विनायक दुधाडे भय्यू महाराजांचा वारसदार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 10:16 PM2018-06-13T22:16:07+5:302018-06-13T22:16:13+5:30
सामान्य कुटुंबातील विनायक दुधाडे हा युवक इंदुर येथील राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांचा वारसदार म्हणून भय्यू महाराजांनी लिहून ठेवले आहे.
- विनोद गोळे
पारनेर- तालुक्यातील लोणी हवेली येथील सामान्य कुटुंबातील विनायक दुधाडे हा युवक इंदुर येथील राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांचा वारसदार म्हणून भय्यू महाराजांनी लिहून ठेवले आहे. सामान्य सेवेक-याला अशा प्रकारे पहिल्यांदाच एखाद्या महाराजांचा वारसदार ठरवला गेलं आहे.
इंदुर येथील राष्ट्रसंत उदयसिंह देशमुख उर्फ भय्यूजी महाराज यांनी मंगळवारी दुपारी इंदुर येथे राहत्या घरी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. देशभरात मोठा शिष्यपरिवार भय्यू महाराजांचा असल्याने देशभरातील भक्तांना धक्का बसला. भय्यूजी महाराज यांनी एक चिठ्ठी लिहून आपली सर्व संपत्ती व गादीचा वारसदार म्हणून त्यांचा युवा सेवेकरी विनायक काशीनाथ दुधाडे यांचे नाव घोषित केल्याने विनायक दुधाडे देशभरात प्रकाशझोतात आला आहे. विनायकबरोबरच पारनेर तालुका व लोणी हवेली गावही उजेडात आले आहे. विनायक दुधाडेचे वडील काशीनाथ हे इंदुरच्या मिलमध्ये नोकरी करीत होते. पारनेर तालुक्यातील हंगा, लोणी हवेली, गटेवाडी येथील लोक इंदुरमध्ये राहण्यास होते. त्यामुळे काशीनाथ यांचा भय्यू महाराज यांच्याबरोबर त्यांचे घनिष्ठ संबंध होते. आपले मामा राजेंद्र चेडे यांच्याकडे राहून विनायक याने शिक्षण घेतले. उत्कृष्ट वेगवान गोलंदाज म्हणूनही तो क्रिकेटप्रेमींमध्ये आवडीचा होता. पारनेर महाविद्यालयातून पदवीधर झाल्यानंतर विनायक व त्याचा आत्येभाऊ इंजिनीअरिंग झालेला दत्तात्रय शेरकर या दोघांना नोकरी मिळावी म्हणून विनायकचे वडील काशीनाथ दुधाडे हे त्यांचे परिचित असलेले भय्यूजी महाराज यांच्याकडे सन १९९८ मध्ये घेऊन गेले. त्यावेळी विनायकमधील चुणूक व त्याचा नम्र स्वभाव पाहून भय्यू महाराजांनी त्याला स्वतःकडेच कामकाज पाहण्यासाठी घेऊन ठेवले, तर दत्ता शेरकर यांना औरंगाबाद येथील आश्रमाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर विनायकने महाराजांकडे सेवेकरी म्हणूनच सेवा सुरू केली. महाराजांकडील आध्यात्मिक कामात सुरुवात सुरू असतानाच महाराष्ट्रातील तत्कालीन मुखयमंत्री विलासराव देशमुख यांच्याविरोधात काँग्रेसचे आमदार जात असताना काँग्रेसच्या ४५ आमदारांना ताब्यात ठेवून देशमुख यांच्यावरील अविश्वास ठराव बारगळ्यास मदत केल्यानंतर भय्यूजी महाराज प्रकाशझोतात आले होते. त्यानंतर देशभरात दौरे सुरू झाल्यानंतर विनायक हाच संपूर्ण काम पाहत असे. विनायकच्या वडिलांचे लोणी हवेलीत छोटे घर व शेतजमीन आहे. अनेकदा भय्यू महाराज लोणी हवेली येथे येत होते.
दोन वर्षांपूर्वीच महाराजांकडून विनायक मानसपुत्र जाहीर
विनायक दुधाडे यांच्याकडे सुमारे वीस वर्षापासून भय्यूजी महाराज यांच्या सदगुरू दत्त पारमार्थिक ट्रस्टची जबाबदारी होती. विनायकची सेवा व त्यातील निष्ठा व प्रामाणिक काम पाहून भय्यूजी महाराज यांनी विनायक यास दोन वर्षांपूर्वीच मानसपुत्र जाहीर केले होते, असे नगरसेविका शशिकला शेरकर, विनायकची बहीण नगरसेविका विजेता सोबले, मामा राजेंद्र चेडे, उदय शेरकर यांनी सांगितले. भय्यूजी महाराज यांचा पारनेर तालुक्यात मोठा संपर्क होता.