श्रीगोंद्यात पोस्टल मतदान गोपनीयतेचा भंग; युनियन बँकेच्या अधिका-यांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 12:04 PM2019-10-20T12:04:43+5:302019-10-20T12:05:36+5:30
पोस्टल मतदान करतानाचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. यामुळे गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी युनियन बँकेच्या पंढरपूर शाखेतील अधिकारी संतोष छबुराव खंडागळे (रा.लोणीव्यंकनाथ, ता.श्रीगोंदा) याच्याविरुद्ध शनिवारी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीगोंदा : पोस्टल मतदान करतानाचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. यामुळे गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी युनियन बँकेच्या पंढरपूर शाखेतील अधिकारी संतोष छबुराव खंडागळे (रा.लोणीव्यंकनाथ, ता.श्रीगोंदा) याच्याविरुद्ध शनिवारी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी श्रीगोंदा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास भाजपाचे प्रतिनिधी तुकाराम दरेकर हे कार्यालयात आले. त्यांनी श्रीगोंदा येथील पोस्टल मतपत्रिका नंबर १२९३ वर कोणी तरी इसमाने मतदान करुन मतदान प्रकियेचा गोपनियतेचा भंग केला आहे, असे सांगितले. ही मतपत्रिका कोणाला दिली आहे. याबाबत शोध घेतला असता सदरची मतपत्रिका संतोष छबुराव खंडागळे यास दिल्याचे आढळून आले. तो सध्या पंढरपूर येथील युनियन बँकेच्या लक्ष्मी रोड शाखेत कार्यरत आहे. तो सध्या मतदान केंद्राध्यक्ष म्हणून सोलापूर जिल्ह्यात निवडणूक कामानिमित्त जाणार आहेत. खंडागळे यांनी मतपत्रिकेवर मतदान केले. त्यानंतर मतपत्रिका बंद लिफाफ्यात पाठविण्यापूर्वी अनाअधिकाराने मतदान केल्याची व्हिडीओ क्लिप काढली. ती उघड करण्यासाठी सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. गोपनियतेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक भरारी पथकातील विकास पवार यांच्या फिर्यादीवरून संतोष खंडागळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.