नियमांचे उल्लंघन; संगमनेर शहरातील दुकान सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 03:38 PM2020-05-15T15:38:00+5:302020-05-15T15:38:12+5:30
संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौक परिसरातील एक दुकान संगमनेर नगरपालिका प्रशासनाने सील केले. शुक्रवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
संगमनेर : शहरासह तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक व कुरण गावात प्रशासनाने हॉटस्पॉट जाहिर केला आहे. या काळात येथील अत्यावश्यक सेवेसह सर्वच दुकाने बंद ठेवण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश आहेत. मात्र, नियमांचे उल्लंघन करून दुकान सुरू ठेवल्याने शहरातील चंद्रशेखर चौक परिसरातील एक दुकान संगमनेर नगरपालिका प्रशासनाने सील केले. शुक्रवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
धांदरफळ बुद्रूक येथील वयोवृध्द व्यक्तीचा कोरोनाची लागण होवून मृत्यू झाला होता. या व्यक्तीच्या संपर्कातील सात जणांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. शहरातील कुरण रस्ता परिसरातील एका वयोवृध्द महिलेसही कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांच्या आदेशान्वये संगमनेर शहरासह तालुक्यातील धांदरफळ बु्रदूक व कुरण गावात ९ ते २३ मेपर्यंत हॉटस्पॉट जाहिर करण्यात आला आहे. या काळात अत्यावश्यक सेवेसह सर्वच दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. शहरातील सर्वच प्रभागात नगरपारिषदेच्या माध्यमातून नागरिकांना जीवनावश्यक वस्तू, औषधे, भाजीपाला, दूध घरपोहोच करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन करून चंद्रशेखर चौकातील दत्ता प्रोव्हिजन हे दुकान सुरू होते. तेथे नागरिकांची गर्दी झाली होती. याची माहिती काही स्थानिक नागरिकांनी मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांना कळविली. या दुकानावर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पालिकेच्या पथकास दिले. पथकाने तात्काळ तेथे जात कारवाई करीत हे दुकान सील केले. राजेंद्र सुरग, सतिष बुरूंगुले, सुरेश सातपुते, नाजीर पठाण, रफिक बागवान, अनिल काळण, भीमाशंकर वर्पे, गौरव मंत्री आदींच्या पथकाने ही कारवाई केली.