शेतीच्या वादातून दोन गटात जोरदार हाणामारी; तीन जखमी, ९ जणांविरुध्द गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 11:40 AM2020-06-12T11:40:32+5:302020-06-12T11:41:02+5:30
शेत जमिनीतील पाणी काढण्याच्या वादातून राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना ९ जून रोजी सायंकाळी घडली आहे. यात तीन जण जखमी झाले आहेत. याबाबत राहुरी पोलिसांत परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राहुरी : शेत जमिनीतील पाणी काढण्याच्या वादातून राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना ९ जून रोजी सायंकाळी घडली आहे. यात तीन जण जखमी झाले आहेत. याबाबत राहुरी पोलिसांत परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राहुरी तालुक्यातील शिलेगाव येथे ९ जून रोजी संध्याकाळी साडेसात वाजेदरम्यान दोन गटात शेत जमिनीतील पाणी काढण्याच्या कारणावरून मोठा वाद निर्माण झाला होता. यावेळी एका गटाने सिनेस्टाईलने हातात लोखंडी कोयता, लोखंडी गज, लाकडी दांडे हातात घेऊन एका कुटूंबावर सशस्त्र हल्ला केला. यात तीन जण जखमी झाले आहेत.
याबाबत संजय विठ्ठल कातोरे (रा.शिलेगाव) यांच्या फिर्यादीवरून स्वप्निल अशोक तागड, दादासाहेब अशोक तागड (दोघे रा. शिलेगाव), मच्छिंद्र विश्वनाथ म्हसे, दत्तात्रय विश्वनाथ म्हसे, महेश गंगाराम म्हसे, अप्पासाहेब भानुदास म्हसे (सर्व रा.कोंढवड) या सहा जणांविरोधात जबरदस्त हाणामारी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागूल हे करीत आहेत.
तर दुसरी फिर्याद रात्री उशीरा दाखल झाली आहे. मच्छिंद्र म्हसे (रा. कोंढवड ) यांच्या फिर्यादीवरून विजय विठ्ठल कातोरे, संजय विठ्ठल कातोरे, अजय विठ्ठल कातोरे या तिघांविरोधात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अमित राठोड हे करीत आहे.
राहुरी पोलिसांत परस्पर विरोधात दोन्ही गटातील एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील सर्व आरोपी पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.