आंदोलनातही एसटीवर ‘विठ्ठलकृपा’
By चंद्रकांत शेळके | Published: August 2, 2018 03:40 PM2018-08-02T15:40:50+5:302018-08-02T15:41:27+5:30
राज्यात विविध ठिकाणी आंदोलनात एसटी बस लक्ष्य होत असताना नगर विभागावर मात्र विठ्ठलकृपा झाली आहे. आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला सोडलेल्या जादा बसगाड्यांमुळे आठवडाभरात एसटी महामंडळाच्या नगर विभागाला दीड कोटीचे उत्पन्न मिळाले आहे.
चंद्रकांत शेळके
अहमदनगर : राज्यात विविध ठिकाणी आंदोलनात एसटी बस लक्ष्य होत असताना नगर विभागावर मात्र विठ्ठलकृपा झाली आहे. आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला सोडलेल्या जादा बसगाड्यांमुळे आठवडाभरात एसटी महामंडळाच्या नगर विभागाला दीड कोटीचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीपेक्षा कमी फेऱ्या होऊनही साडेअकरा लाखांचा अतिरिक्त फायदा एसटीला झाला आहे.
आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून पंढरपूरला लाखो भाविक विठ्ठल दर्शनासाठी येत असतात. यासाठी राज्यातील एसटीच्या बहुतांश विभागांतून जादा बस सोडल्या जातात. यंदा नगरमधून पंढरपूर यात्रेसाठी २० ते २७ जुलैदरम्यान २१६ जादा बस सोडल्या होत्या. २३ जुलैला आषाढी एकादशी झाल्यानंतर २४ जुलैपासून मराठा आरक्षणासाठी राज्यात तीव्र आंदोलने सुरू झाली. ठिकठिकाणी रास्ता रोको, बंद पाळण्यात आला.
तसेच काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने एसटी महामंडळाच्या बसगाड्यांना मोठ्या प्रमाणावर लक्ष्य करण्यात आले. बसवर दगडफेक करण्यापासून थेट गाड्या पेटवून दिल्याने एसटी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांत बस बंद ठेवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला.
परंतु नगर विभाग मात्र याला अपवाद ठरले. नगर विभागामधून सोडण्यात आलेल्या सर्व २१६ जादा गाड्यांचे व्यवस्थित नियोजन झाल्याने यंदाची पंढरपूर यात्रा यशस्वी ठरली. नगर-सोलापूर मार्गावरही आंदोलनाचे सावट होते. परंतु नगर विभागाने योग्य नियोजन, पोलिसांची मदत घेत प्रवाशांना सुखरूप घरी पोहोचवले. खासगी वाहतुकीपेक्षा भाविकांनी एसटी महामंडळावर विश्वास दाखवला.
या सात दिवसांत २१६ गाड्यांनी पंढरपूरसाठी १५७० फेºया करत ३ लाख ४० हजार १७७ किलोमीटर प्रवास केला. यात प्रवाशी भारमान ८१ टक्के होते. तर ८५ हजार प्रवाशांनी प्रवास केला.
मागील वर्षी एवढ्याच जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे यंदा मागील वर्षीपेक्षा ४० हजार किलोमीटर प्रवास घटला असूनही उत्पन्न साडेअकरा लाखांनी वाढले आहे. जिल्ह्यातील ११ आगारांपैकी सर्वाधिक ३३६ फेºया तारकपूर आगाराने केल्या.
यंदा आषाढी यात्रेवर आंदोलनाचे सावट होते. आमच्या बसवर बºयाच ठिकाणी दगडफेक झाली. परंतु भाविकांच्या सोईसाठी एकही बस बंद ठेवली नाही. पोलीस बंदोबस्तात पंढरपूरहून बस आणल्या. प्रसंगी चालक-वाहक व एसटी अधिकाºयांनी वर्गणी करून प्रवाशांच्या जेवणाची व्यवस्था केली आणि भाविकांना सुखरूप घरी पोहोचवले. योग्य नियोजन केल्यानेच आमचे उत्पन्न यंदा वाढले आहे.
- विजय गिते, विभाग नियंत्रक, अहमदनगर विभाग