विठ्ठलनामाने सीताराम गड दुमदुमला

By Admin | Published: September 11, 2014 11:07 PM2014-09-11T23:07:54+5:302023-10-30T11:49:23+5:30

खर्डा : सीताराम गडावर समाधी पूजन होऊन मोठा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.

Vitthalnama Seetaram Gad Dumudu | विठ्ठलनामाने सीताराम गड दुमदुमला

विठ्ठलनामाने सीताराम गड दुमदुमला

खर्डा : स्व. ह.भ.प. सीताराम महाराज उंडेगावकर यांच्या निधनाला गुरुवारी (११ सप्टेंबर) चौदा दिवस (चौदावा) पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सीताराम गडावर समाधी पूजन होऊन मोठा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी गड परिसर ‘विठ्ठलनाम.. सीताराम नामाने’ दुमदुमून गेला होता.
सकाळी समाधी पूजन झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज मंझरीकर (बीड) यांचे कीर्तन झाले. कीर्तन सोहळ्यानंतर चौदा ब्रह्मचारी वृद्धांची पूजा झाली. या ब्रह्ममुर्तीमध्ये गुलाब महाराज खालकर आर्वी (पुणे), लक्ष्मण महाराज मेंगडे (नेकनूर, ता.पाटोदा, जि.बीड), किसन महाराज पवार (पंढरपूर), बबन महाराज बहिरवाल (कडा), परमेश्वर महाराज बोधले (डिकसळ, जि. उस्मानाबाद), भक्तीदास महाराज शिंदे (चऱ्हाटा, जि.बीड), उत्तम महाराज वराट (पिंपळवंडी, ता.पाटोदा, जि.बीड), हनुमान महाराज मते (दहिफळ, ता.येवला, जि.उस्मानाबाद), कैलास महाराज भोरे (देवदैठण, ता.जामखेड), शेषराव महाराज ऋषिकेश (हिमाचल प्रदेश), विकास महाराज वायसे (लोणी, ता.जामखेड), लोखंडे महाराज (पाटोदा, जि.बीड), नाना महाराज पांडे (पांडा, ता.करमाळा, जि.सोलापूर), ओंकारदास महाराज (आळंदी) यांचे पूजन होऊन संतभोजन झाले. त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
सीताराम गडावर अर्पण व्हॉलंटरी रक्तपेढी, अहमदनगर व शहा रक्तपेढी बार्शी, जि. सोलापूर यांच्या सौजन्याने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी ३५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. पोलीस, महिला पोलिसांसह महिलांनीही शिबिरात सहभाग नोंदवून रक्तदान केले.
गेल्या तेरा दिवसांपासून सीताराम गडावर कीर्तन, भजन, भागवत कथा व इतर विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडले. शिर्डी-हैद्राबाद राज्य मार्गावर सीताराम गड येत असल्याने समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविक येथे आवर्जुन थांबत होते. सीताराम गडावर बाबांचे फोटो, समाधी सोहळ्याचीे डीव्हीडी, बाबांवरील लेख आदी साहित्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली.
लक्ष्मण महाराज शिंदे (परभणी), तुकाराम महाराज कुंभार (आळंदी), हरी महाराज गिते (दिघोळकर), नारायण महाराज (आळंदी) तसेच उद्योगपती, नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते, वारकरी, भजनी भक्तगणांनी यावेळी हजेरी लावली.
सीताराम गडावरील बंदोबस्तासाठी पोलिसांना स्वयंसेवकांनी मदत केली. यावेळी मोठे अन्नदान झाले. उपस्थितांना सीताराम गडाचे वारसदार, मठाधिपती महालिंग महाराज नगरे यांनी मार्गदर्शन केले.
(वार्ताहर)
देणग्या अन् गुप्तदानही
सीताराम महाराज उंडेगावकर महाराजांच्या श्रध्देपोटी देणगी, गुप्तदान देणारांची संख्या मोठी होती. सीताराम गडाच्या सुशोभिकरणासाठी या देणग्या जमा झाल्या. एक ते दीड लाखाच्या आसपास भाविकांनी समाधीचे दर्शन घेतले. एक ते दीड कि.मी. अंतराची दर्शन रांग लागली होती. अनेक भाविक पाच तास रांगेत उभे होते. सर्वत्र भावनिक, भक्तिमय वातावरण दिसून आले.

Web Title: Vitthalnama Seetaram Gad Dumudu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.