मतदारांना घरपोहोच मिळणार वोटर स्लिप : मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 06:43 PM2019-04-20T18:43:38+5:302019-04-20T18:45:21+5:30
नगर लोकसभा मतदारसंघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान होत असून, प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे़ मतदारांना घरपोहोच वोटर स्लिप देण्यात येणार आहे़
अहमदनगर: नगर लोकसभा मतदारसंघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान होत असून, प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे़ मतदारांना घरपोहोच वोटर स्लिप देण्यात येणार आहे़ शुक्रवारपर्यंत मतदारसंघातील १४ लाख १२ हजार ८२९ मतदारांना स्लिपचे वाटप करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले़
नगर लोकसभा मतदारसंघात १८ लाख ५४ हजार २४८ मतदार असून यात ८ लाख ८३ हजार ५२९ महिला मतदार आहेत़ मतदान केद्रांवर ८ हजार ९३२ अधिकारी व कर्मचारी नियुक्त राहणार आहेत़ १९८ क्षेत्रिय अधिकाऱ्यांची नियुक्ती आहे़ मतदान केंद्रावर जाण्यासाठी ६४६ वाहने आहेत़ मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी टपाली मतपत्रिकांची सुविधा उलब्ध करून देण्यात आली आहे़ प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महिला मतदारांसाठी सखी मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत़ असे एकूण दहा सखी मतदान केंद्र राहणार आहेत़ प्रत्येक मतदान केंद्रावर व्हिव्हिपॅट मशिन राहणार आहे़ मतदारांना मतदार यादीत नाव शोधताना अडचणी अल्यास १९५० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले़