मतदारांनो डायल @ १९५० : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 11:53 AM2019-01-16T11:53:45+5:302019-01-16T11:54:34+5:30
देश स्वतंत्र झाल्यानंतर निवडणूकविषयक घटनात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी २५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली.
अहमदनगर : देश स्वतंत्र झाल्यानंतर निवडणूकविषयक घटनात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी २५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. त्याच वर्षाचे औचित्य साधून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत नागरिक व मतदारांच्या सोयीसाठी जिल्हा संपर्र्क केंद्राची स्थापना करण्यात आली असून तेथे ‘१९५०’ हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील नागरिकांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीबाबत असलेल्या प्रश्नांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी, मतदारयादीतील नाव व अनुक्रमांक, मतदारयादीत नाव समाविष्ट करणे किंवा दुरूस्त करणे यासह निवडणूक प्रणालीबाबत माहिती देण्याच्या उद्देशाने नागरिकांना व मतदारांना माहिती जिल्हा केंद्रातील ‘१९५०’ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्वत: या क्रमांकावर दूरध्वनी करून या केंद्राचे औपचारिक उद्घाटन केले.
जिल्हा निवडणूक शाखेतील लिपिक स्वाती राठोड यांच्याकडे या केंद्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सुटीचे दिवस वगळता कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत मतदारांना येथे संपर्क करता येईल. प्रत्यक्ष निवडणूक कालावधीमध्ये हे केंद्र अहोरात्र सुरू राहणार आहे. सध्या ही सुविधा केवळ लँडलाईन दूरध्वनी क्रमांकावरून उपलब्ध असून लवकरच मोबाईलवरूनही उपलब्ध करण्यात येईल. सर्व मतदारांनी यावर संपर्क करून आपल्या शंकांचे निरसन करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरूण आनंदकर यांनी केले आहे.