...तर साईबाबा झाले असते मतदार, आॅनलाइन मतदारयादीत खोडसाळपणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 09:37 PM2018-08-28T21:37:52+5:302018-08-28T21:38:42+5:30
एका अज्ञात मतदाराने साईबाबांच्या नावे आॅनलाइन मतदार नोंदणी अर्ज भरून या यादीत साईबाबांचेच छायाचित्र अपलोड केले.
अहमदनगर : एका अज्ञात मतदाराने साईबाबांच्या नावे आॅनलाइन मतदार नोंदणी अर्ज भरून या यादीत साईबाबांचेच छायाचित्र अपलोड केले. सुदैवाने ही बाब निवडणूक यंत्रणेच्या लक्षात आली, अन्यथा शिर्डी मतदारसंघात साईबाबांचेच मतदार कार्ड तयार झाले असते. यासंदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांनी हा खोडसाळपणा करणा-याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अद्ययावत मतदारयादी तयार करण्याचे काम सुरू आहे. मतदान केंद्र अधिकारी घरोघरी जाऊन नवीन मतदारांची नोंदणी करीत आहेत. याशिवाय निवडणूक आयोगाने मतदारांच्या आॅनलाइन मतदार नोंदणीचीही व्यवस्था केली आहे. यात एका मतदाराने शिर्डी विधानसभा मतदारसंघासाठी आॅनलाइन अर्ज केला. त्यात नावाच्या कॉलममध्ये ‘साई’, वडिलांचे नाव ‘राम राम’, वय २४ अशी माहिती भरली. तसेच छायाचित्राच्या कॉलममध्ये साईबाबांची प्रतिमा अपलोड केली.
हा खोडसाळपणा करणारा अर्ज निवडणूक अधिका-यांच्या लगेच लक्षात आला. उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना दिली. जिल्हाधिका-यांनी या प्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी तातडीने सूत्रे हलवली. राहात्याचे नायब तहसीलदार सचिन म्हस्के यांच्या फिर्यादीनुसार मंगळवारी (दि. २८ ) राहाता पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशात मतदारयादीत मतदारांच्या छायाचित्राऐवजी पशू-पक्ष्यांचे छायाचित्र वापरण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता शिर्डी मतदारसंघातही काहीसा असाच प्रकार समोर आला आहे. त्यामुळे निवडणूक यंत्रणाही सतर्क झाली आहे.
आयटी कायदा २००० अंतर्गत निवडणूक व मतदार यादीत फेरफार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याचे हे राज्यातील पहिलेच प्रकरण आहे. मतदार याद्या व इतर निवडणूक विषयक कामामध्ये मुद्दाम खोडसाळपणा करण्याच्या उद्देशाने अशा प्रकारे चुकीचे आॅनलाइन अर्ज भरून निवडणूक प्रशासनाची दिशाभूल करणा-यांची गय केली जाणार नाही आणि त्यांना कठोर शासन केले जाईल.
- अरुण आनंदकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी