जामखेडमध्ये मतदानावरून भाजप-राष्ट्रवादीत राडा; दोन जण जखमी, पाच जण ताब्यात, वाहनावर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 04:16 PM2019-10-21T16:16:18+5:302019-10-21T16:16:43+5:30
जामखेड तालुक्यातील बांधखडक येथे मतदानाला जात असताना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात शाब्दिक चकमकीतून हाणामारी झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या चाकू हल्ल्यात दोन जखमी झाले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वाहनावर दगडफेक करून वाहनाची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
जामखेड : तालुक्यातील बांधखडक येथे मतदानाला जात असताना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात शाब्दिक चकमकीतून हाणामारी झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या चाकू हल्ल्यात दोन जखमी झाले आहेत. यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वाहनावर दगडफेक करून वाहनाची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांची माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील बांधखडक येथे दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भाजपचे कार्यकर्ते भालेराव हिरालाल वनवे (वय २८), हर्षवर्धन शंकर फुंदे (वय २२, रा. दोघे बांधखडक) हे मतदान करण्यासाठी जात होते. यावेळी विरोधी गटातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी भालेराव, वनवे यांच्या नाकावर व हातावर चाकू हल्ला केला. तर हर्षवर्धन फुंदे याच्या हातावर चाकू हल्ला करण्यात आला. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना जामखेड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात केले आहे.
भाजपच्या दोन कार्यकर्त्यांवर चाकू हल्ला झाल्यानंतर चिडलेल्या काही कार्यकर्त्यांनी तेथे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या फोरच्युनर या वाहनावर दगडफेक करण्यात आली आहे. यामुळे या वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सहायक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी हे वाहन ताब्यात घेतले आहे. तसेच काकासाहेब खाडे व इतर अनोळखी चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.