नगरमधून व्हीआरडीई स्थलांतराचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:17 AM2021-01-09T04:17:25+5:302021-01-09T04:17:25+5:30
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याचे वैभव व एक हजारहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना रोजगार देणारी व्हीआरडीई ही संस्था नगरमधून अन्य राज्यात स्थलांतरीत ...
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याचे वैभव व एक हजारहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना रोजगार देणारी व्हीआरडीई ही संस्था नगरमधून अन्य राज्यात स्थलांतरीत करण्याचा घाट संरक्षण मंत्रालयाकडून घातला जात असून येथील कामगारांनी यास तीव्र विरोध केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामार्फत संरक्षण मंत्रालयाकडे याबाबत पाठपुरावा करण्याची ग्वाही आमदार निलेश लंके यांनी शुक्रवारी या कामगारांना दिली. याबाबत संघटनेने इतर लोकप्रतिनिधींमार्फतही लढा सुरू केला आहे.
व्हेईकल रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट एस्टाब्लिशमेंट (वाहन संशोधन व विकास संस्था) ही संस्था नगर-दौंड रस्त्यावर असून तेथील सुमारे साडेसातशे एकरावर संस्थेचा पसारा आहे. भारत सरकारच्या संरक्षण विभागातील डीआरडीओ (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) अंतर्गत ही संस्था कार्यरत असून भारताच्या सशस्त्र सेनेला लागणारी शस्त्रे, रणगाडे, क्षेपणास्त्रे, लाँचर, चिलखती वाहने, ड्रोन इंजिन बनवण्यासह त्यांची चाचणी व्हीआरडीईत करून सैन्यदलाला उपलब्ध करून दिले जाते. याशिवाय सर्वप्रकारच्या चारचाकी, दुचाकी वाहनांची चाचणी व क्षमता प्रमाणीकरण करणारे हे भारतातील एकमेव केंद्र आहे. संस्थेच्या देशभरात ५२, तर महाराष्ट्रात ७ शाखा आहेत. त्यातील नगरची एक प्रमुख शाखा आहे. नगरच्या शाखेतील प्रयोगशाळेने आतापर्यंत अनेक उपयुक्त संशोधने केली आहेत. अशा प्रकारे नगरची एक वेगळी ओळख असलेली ही संस्था चेन्नई, हैदराबाद व बँगलोरला हलवण्याच्या हालचाली सुरू असल्याने या संस्थेत कार्यरत १ हजारहून अधिक अधिकारी-कर्मचारी धास्तावले आहेत.
चार दिवसांपूर्वी संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नगरमध्ये बैठक घेऊन संस्था स्थलांतराच्या हालचालीची माहिती दिली. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ही संस्था वाचवण्यासाठी लढा सुरू केला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, निलेश लंके, माजी आमदार दिलीप गांधी यांच्यासह शिवसेनेच्या काही नेत्यांना कर्मचाऱ्यांनी निवेदन दिले आहे.
दरम्यान, शुक्रवारी आमदार निलेश लंके यांनी व्हीआरडीत कर्मचाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. नगरचे वैभव असलेली ही संस्था कोणत्याही स्थितीत स्थलांतरीत होणार नाही. नगर जिल्हा तसेच परिसरातील १ हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना येथून रोजगार मिळतो आहे. स्थलांतरामुळे या कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे. शिवाय संस्थेमुळे आजूबाजूचा परिसर विकसित झाला आहे. स्थलांतर झाल्यास यावर अवलंबून व्यावसायिक, तसेच एमआयडीसीतील उद्योजकांनाही फटका बसणार आहे. त्यामुळे स्थलांतरचा हा निर्णय रद्द करण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली असून लवकरच त्यांच्यामार्फत संरक्षणमंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार आहे, अशी ग्वाही आ. लंके यांनी दिली.
-----------------------
व्हीआरडीईची वैशिष्ट्ये
डीओरडीओ अंतर्गत संस्था कार्यरत.
स्थापना - १९२९.
आधी ही संस्था पाकिस्तानातल्या रावळपिंडी जवळच्या चकलाला येथे होती.
१९४७ मध्येती अहमदनगरला हलवण्यात आली.
पुणे, मुंबईसह महाराष्ट्रात ७ शाखा.
नगरच्या व्हीआरडीईत १००० हून अधिक वैज्ञानिक, अधिकारी-कर्मचारी कार्यरत.सुमारे साडेसातशे एकरावर संस्थेचा विस्तार.
अग्नी १,४ व ५ क्षेपणास्त्रासाठी संपूर्ण भारतीय बनावटीचे लाँचर व्हीआरडीईत तयार. त्याचे एलएसपीचे काम प्रगतीपथावर आहे.
एनबीटी, एईआरव्ही, तसेच एफआयसीव्ही हे अत्याधुनिक रणगाडे संस्थेतून तयार.
संस्थेतील एनसीएटी या प्रयोगशाळेत भारतातल्या सर्व प्रकारच्या दुचाकी, चारचाकी, तसेच सैनिकी वाहनांची चाचणी व प्रमाणीकरण केले जाते. यासाठीचे भारतातील हे एकमेव केंद्र असून जागतीक दर्जाचे टेस्टिंग ट्रॅक येथे आहेत.
-----------
फोटो - ०८निलेश लंके
राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी शुक्रवारी व्हीआरडीईत कर्मचाऱ्यांची भेट देऊन पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.