‘वृद्धेश्वर’च्या टीमकडून दीड महिन्यात पाच हजार डब्यांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:18 AM2021-05-30T04:18:42+5:302021-05-30T04:18:42+5:30
श्रीगोंदा : कोरोना लाॅकडाऊन काळात श्रीगोंदा शहरातील भिक्षेकऱ्यांची होणारी उपासमार आणि कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांना घरचा आहार देण्याच्या ...
श्रीगोंदा : कोरोना लाॅकडाऊन काळात श्रीगोंदा शहरातील भिक्षेकऱ्यांची होणारी उपासमार आणि कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांना घरचा आहार देण्याच्या भावनेतून वृद्धेश्वर मल्टीस्टेटचे अध्यक्ष विठ्ठलराव वाडगे व त्यांच्या टीमने नारायणानंद सरस्वती अन्नछत्राच्या माध्यमातून दररोज १०० विनामूल्य डबे पोहोच केले. असे त्यांनी दीड महिन्यात पाच हजार डबे विविध ठिकाणी पोहोच केले आहेत.
विठ्ठलराव वाडगे यांनी गेल्या वर्षी अनेक कुटुंबांना मोफत किराणा, धान्य पुरविण्याचे काम केले होते. त्यातून शहर व दुष्काळी भागातील गोरगरिब कुंटुबांना मोठा आधार मिळाला होता. यावर्षी कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर लाॅकडाऊनच्या हालचाली सुरू झाल्या. शहरातील दुकाने हाॅटेल बंद झाली. त्यावर विठ्ठलराव वाडगे यांना गुढीपाडव्याच्या दिवशी नारायणानंद सरस्वती नावाने अन्नछत्र सुरू केले. या माध्यमातून शहरात अन्नसेवेची गुढी उभारली.
सुरुवातीला फक्त दिव्यांग, निराधार यांच्यासाठी वृद्धेश्वर मल्टीस्टेटचे कर्मचारी पोहोच डबे देण्याचे काम करीत होते. मात्र त्यानंतर कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना वेळेवर भोजन मिळत नव्हते. अशा रुग्णांना डबे पोहोच करण्याचे काम हाती घेण्यात आले.
कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांना उभारी घेण्यासाठी आधार मिळाला. नारायणानंद सरस्वती अन्नछत्र माध्यमातून गेल्या दीड महिन्यात ५ हजार डबे पोहोच करून अनेकांची भूक भागविण्यात आली आहे.
---
कोरोना महामारीमुळे संत शेख महंमद महाराज बसस्थानक परिसरातील भिक्षेकरी, दिव्यांगांची उपासमार सुरू झाली. हे दु:ख डोळ्यांनी पाहवले नाही. त्यामुळे नारायणानंद सरस्वती अन्नछत्र सुरू केले. या माध्यमातून अनेकांची भूक भागविण्याचे भाग्य लाभले. यामध्ये वृद्धेश्वर मल्टीस्टेटच्या कर्मचाऱ्यांनी लाखमोलाची मदत केली.
-विठ्ठलराव वाडगे,
अध्यक्ष, वृद्धेश्वर मल्टीस्टेट, श्रीगोंदा
---
२९ वृद्धेश्वर
‘वृद्धेश्वर’च्या टीमकडून जेवणाच्या डब्यांची सुरू असलेली तयारी.