विडी कामगारांनी अडविले पालकमंत्र्यांचे वाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2016 11:11 PM2016-04-25T23:11:38+5:302016-04-25T23:22:18+5:30
अहमदनगर : पालकमंत्री राम शिंदे यांचे वाहन विडी कामगारांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात अडविले़
अहमदनगर : पालकमंत्री राम शिंदे यांचे वाहन विडी कामगारांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात अडविले़ आंदोलनकर्त्यांनी शिंदे यांना घेराव घालून कामगारांचा प्रश्न सोडविण्याची मागणी यावेळी केली़ त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण होते़
पालकमंत्री शिंदे सोमवारी नगर दौऱ्यावर आले होते़ जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी एक वाजता झालेल्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीला शिंदे यांनी हजेरी लावली़ पालकमंत्र्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होताच आंदोलनकर्त्या विडी कामगार प्रवेशद्वारावर त्यांना अडवे झाले़ पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला़
शिंदे यांनी गाडीतून उतरवून विडी कामगारांशी चर्चा केली़ यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान शहरातील विडी कामगारांना शिधापत्रिकेवर मोफत धान्य उपलब्ध करून देण्याबरोबरच विडी कामगारांचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शिंदे यांनी यावेळी दिले़
विडी कारखाने गेल्या २५ दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे कामगारांचा रोजगार बुडाला आहे़ कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे़ सोलापूर येथील विडी कामगारांना शिधापत्रिकेवर मोफत धान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे़ त्याप्रमाणे येथील विडी कामगारांनाही मोफत धान्य देण्याची मागणी यावेळी कामगार नेते कॉ़ शंकर न्यालपल्ली, अॅड. सुधीर टोकेकर, शंकर मंगलारप, व्यंकटेश बोगा आदींनी केली़ विडी कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद करण्यात आला़ आंदोलनात गौरव ढोणे, पियुष लुंकड, मोबीन शेख, आनंद भंडारी आदींचा समावेश होता़
(प्रतिनिधी)