हॉटेल मालकाची कार चोरणारा वेटर निघाला सराईत गुन्हेगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:20 AM2021-01-25T04:20:58+5:302021-01-25T04:20:58+5:30
आरणगाव शिवारातील हॉटेलमधून २२ जानेवारी रोजी हॉटेलचे मालक शिवाजी अशोक मोरे यांच्या मालकीची स्विप्ट कार याच हॉटेलमध्ये कामास ...
आरणगाव शिवारातील हॉटेलमधून २२ जानेवारी रोजी हॉटेलचे मालक शिवाजी अशोक मोरे यांच्या मालकीची स्विप्ट कार याच हॉटेलमध्ये कामास असलेला वेटर माउली बांदल याने चोरून नेली. आरोपी हा पेट्रोलपंपावर डिझेल भरणेसाठी गेला असता तेथील व्यवस्थापकाला संशय आल्याने त्याने कारमालकास माहिती दिली. त्यानंतर मोरे यांनी नगर तालुका पोलीस स्टेशनला कार चोरीची फिर्याद दिली. याबाबत पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप व उपनिरीक्षक रितेश राऊत यांनी या कार चोरीबाबत शेजारील जिल्ह्यातील पोलिसांना व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून माहिती दिली.
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी त्यांच्या पथकाला कारचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर, महेश गायकवाड, नीलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड यांच्या पथकाने पेट्रोलिंग दरम्यान शोध घेऊन पुणे-सोलापूर रोडने सिनेस्टाइल पाठलाग करून सहजपूर फाट्याचे पुढे कार अडवून आरोपी माउली ऊर्फ भावड्या मच्छिंद्र बांदल (रा.पारगाव ता.दौंड, जि.पुणे) याला ताब्यात घेतले.
पोलिसांच्या ताब्यातून पळाला होता आरोपी
आरोपी माउली बांदल हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी यवत, दौंड, बारामती तालुका, बिबवेवाडी व पुणे शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरी, लुटमार, वाहनचोरी व इतर असे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. २०१५ मध्ये तो अटकेत असताना पुणे शहर पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेला होता. बांदल याने ऑगस्ट २०१९ मध्ये न्हावरा चौफुला (ता.दौंड) येथून ४० टन मका असा मालाने भरलेला ट्रक ड्रायव्हरला मारहाण करून जबरदस्तीने चोरून नेला होता. सदर गुन्ह्यात अटक होऊन तो सध्या जामिनावर सुटलेला होता.
फोटो - २३ आरोपी
आरणगाव येथून हॉटेलमालकाची कार चोरणाऱ्या आरोपीला पुणे ग्रामीण एलसीबी पथकाने जेरबंद केले.