नगरला ३० वर्षांपासून शिक्षक आमदाराची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 12:58 PM2017-10-12T12:58:31+5:302017-10-12T13:05:37+5:30
पुढील वर्षी नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने शिक्षकांची मतदारनोंदणी सुरू केली आहे. नाशिक विभागात येणा-या नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदूरबार या पाच जिल्ह्यांचा विस्तृत मतदारसंघ असल्याने इच्छुक उमेदवारांना प्रचाराची कसरत करावी लागेल.
चंद्रकांत शेळके
अहमदनगर : पुढील वर्षी होणा-या नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे बिगूल वाजले असून, नगरमधून इच्छुकांनी मोर्चेबांधणीस सुरूवात केली आहे. गेल्या ३० वर्षांपासून नगर जिल्हा शिक्षक आमदारकीच्या प्रतीक्षेत आहे. यावेळी शिक्षक नेते भाऊसाहेब कचरे यांच्यासह शिक्षक भारतीचे सुनील गाडगे, सुनील पंडित हे मैदानात उतरू शकतात.
पुढील वर्षी नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होत आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने शिक्षकांची मतदारनोंदणी सुरू केली आहे. नाशिक विभागात येणा-या नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदूरबार या पाच जिल्ह्यांचा विस्तृत मतदारसंघ असल्याने इच्छुक उमेदवारांना प्रचाराची कसरत करावी लागेल. मागील वेळी संपूर्ण मतदारसंघात ५२ हजार मतदार होते, त्यात नगरच्या १३ हजार मतदारांचा समावेश होता. यावेळी आधीची संपूर्ण मतदारयादी बरखास्त करून पुन्हा नव्याने नोंदणी करण्यात येणार आहे. यावेळी ६० हजार मतदारांची नोंदणी होऊ शकते. त्यात नगरचा वाटा २० हजार शिक्षकांचा असू शकतो.
गेल्या तीस वर्षांचा आढावा घेतला तर मतदारसंघावर नाशिक जिल्ह्याचेच वर्चस्व राहिले आहे. १९८२ ते ८८ मध्ये रा. ह. शिंदे यांच्या रूपाने नगरला आमदारकी मिळाली होती, एवढाच काय तो अपवाद. त्यानंतर अनेकांनी प्रयत्न करूनही अद्याप यश आलेले नाही. ज. यू. ठाकरे (धुळे), टी. एफ. पवार (नाशिक), दिलीप सोनवणे (जळगाव) व विद्यमान आमदार अपूर्व हिरे (नाशिक) असा हा आलेख नाशिकच्या आसपासच कायम राहिला.
२००६ मध्ये राष्ट्रवादी शिक्षक संघटनेकडून प्रा. भाऊसाहेब कचरे व अपक्ष सुभाष कडलग यांनी, तर पुढे २०१२ मध्ये शिक्षक परिषदेकडून मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष सुनील पंडित व शिक्षक लोकशाही आघाडीकडून (टीडीएफ) राजेंद्र लांडे या नगर जिल्ह्यातील उमेदवारांनी नशिब आजमावले. परंतु त्यांच्या पदरी निराशाच आली.
यावेळी पुन्हा एकदा नगर जिल्ह्यातून अनेकजण दंड थोपटण्याची चिन्हे आहेत. त्यात शिक्षक नेते भाऊसाहेब कचरे, मुख्याध्यापक संघटनेचे सुनील पंडित यांच्यासह शिक्षक भारतीचे नेते सुनील गाडगे इच्छुक आहेत. शिक्षक भारती या निवडणुकीत कोणाला पाठिंबा न देता स्वतंत्र उमेदवारी करणार असल्याचे आमदार कपिल पाटील व राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी जाहीर केले आहे. गाडगे यांचे संघटनेतील योगदान, शिक्षकांशी दांडगा संपर्क लक्षात घेता शिक्षक भारतीकडून त्यांनाच उमेदवारीचे संकेत मिळत आहेत.