नुकसानभरपाईसाठी महिला शेतकऱ्याची वणवण भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:15 AM2021-06-26T04:15:58+5:302021-06-26T04:15:58+5:30
जया आढाव व त्यांच्या कुटुंबीयांची पिंपळगाव उज्जैनी येथील गट क्रमांक ६४४ व ६४५ मधील तीन हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाचे ३ ...
जया आढाव व त्यांच्या कुटुंबीयांची पिंपळगाव उज्जैनी येथील गट क्रमांक ६४४ व ६४५ मधील तीन हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाचे ३ हजार झाडे होते. या संपूर्ण बागेला ठिंबक सिंचन बसविण्यात आले होते. ४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता शेतालगत असलेल्या वनक्षेत्राला आग लागली. ही आग थेट आढाव यांच्या शेतात आली. यामध्ये डाळिंबाची झाडे, पाइपलाइन सिंचन संच, मजुरांची झोपडी, जनावरांचा चारा, तळ्याचे कापड असे सर्वकाही खाक झाले. या घटनेनंतर आढाव यांनी तलाठी, तहसीलदार व कृषी विभागात अर्ज देऊन स्थळपाहणी करून पंचनामा करण्याची मागणी केली. यावर मात्र कुणीच दखल घेतली नाही. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. या अर्जावर आपत्ती व्यवस्थापनचे तहसीलदार व्ही. के. सोमन यांनी २७ एप्रिल रोजी उपवनसंरक्षक यांना पत्र देऊन नियमानुसार योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. या पत्राच्या संदर्भात वनविभागाने मात्र काहीच दखल न घेतल्याने आढाव यांना नुकसानभरपाईसाठी सरकारी कार्यालयात भटकंती करण्याची वेळ आली आहे.
--------------------------
अधिकारी म्हणतात, आम्ही काही करू शकत नाही
आपत्ती व्यवस्थापनाने वनविभागाला पत्र दिल्यानंतर जया आढाव यांनी वनविभागात नुकसानभरपाईसाठी पाठपुरावा केला. तेथील अधिकाऱ्यांनीही हात वर करत ही तर नैसर्गिक आपत्ती होती. त्यात आम्ही काही करू शकत नाही. असे सांगितले. त्यामुळे जया आढाव या हवालदिल झाल्या असून, नुकसानभरपाईसाठी थेट मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
---------------------------
बँकेचे २० लाख रुपये कर्ज काढून डाळिंबाची बाग फुलविली होती. मात्र वनक्षेत्राला लागलेल्या आगीमुळे डोळ्यादेखत आमचे उभे पीक खाक झाले. यात आमची काय चूक होती. आमचे ४० लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. वनविभागाने या परिसरात जाळपट्टे तयार केले असते तर आग आमच्या शेतापर्यंत आली नसती. आता नुकसान भरपाईसाठी मी आणि माझे पती जनार्दन आढाव सरकारी कार्यालयात हेलपाटे मारत आहोत, मात्र आमची कुणीच दखल घेत नाही.
- जया जनार्दन आढाव, नुकसानग्रस्त शेतकरी
.......................
फोटो २५ नुकसान १,२,३
पिंपळगाव उज्जैनी येथे वनक्षेत्राला आग लागून लगत असलेल्या शेतातील डाळिंब बाग, ठिबक संच व शेततळ्याचे कापड अशा पद्धतीने खाक झाले.