मुलाला शेती हवी पण शेतकरी नवरा नको..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2023 03:33 PM2023-12-05T15:33:44+5:302023-12-06T09:00:18+5:30
मुलाला सरकारी नोकरी हवी, किंवा आयटीत काम करणारा हवा, आर्थिक सुरक्षेची हमी म्हणून घरची शेतीही हवी असा अनाठायी हट्ट उपवर मुलींच्या कुटुंबांकडून केला जात आहे. घरची शेती तरी पाहिजे, पण यांना शेतकरी नवरा नको अशी मुली व तिच्या कुटुंबीयांची अपेक्षा आहे.
मुलाला सरकारी नोकरी हवी, किंवा आयटीत काम करणारा हवा, आर्थिक सुरक्षेची हमी म्हणून घरची शेतीही हवी असा अनाठायी हट्ट उपवर मुलींच्या कुटुंबांकडून केला जात आहे. घरची शेती तरी पाहिजे, पण यांना शेतकरी नवरा नको अशी मुली व तिच्या कुटुंबीयांची अपेक्षा आहे. बरं गलेलठ्ठ पगाराची नोकरी करणारा शेती कधी करेल एवढा सारासार विचार केला जात नाही.
तुळशीच्या लग्नानंतर आता सगळीकडे विवाहाचा धुमधडाका उडालेला आहे, दुसरीकडे अनेक लग्नाळू मुले व मुलींचे विवाह जुळत नाहीत, ही मोठी सामाजिक समस्या बनली आहे. त्यामागे मुलामुलींच्या अनाठायी अपेक्षा हेच महत्त्वाचे कारण आहे. विशेषतः मुलांना या अपेक्षांवर उतरणे आव्हानात्मक झाले आहे.
मुलींपेक्षा मुलांच्या लग्नाची चिंता वाढली
- आता मुली मुलांच्या बरोबरीने शिकल्या आहेत, पाच आकड़ी पगाराची नोकरी करतात त्यांना मुलगाही आपल्याच तोडीचा किंवा वरचढ हवा असतो.
- या अपेक्षांमध्ये जराही तडजोड केली जात नाही. त्यामुळे मुलांची मात्र मोठी अडचण झाली आहे. कितीही चांगले स्थळ असले तरी मुलगी लवकर मिळत नाही.
या मुलांच्या लग्नाची चिंता
- खेड्यात राहणारा: शहरी मुलींना शहरात राहायची सवय असते. पण ग्रामीण भागातील मुलींनाही आता शहरात राहायचे आहे. शहरी राहणीमान, तेथील चकाचाँद, सोयीसुविधा हव्या आहेत.
- कमी शिक्षित: मुलींचे कमीत कमी शिक्षण आता पदवी- पर्यंतचे आहे. त्यापेक्षा कमी शिकलेली मुलगी मिळणे क्चचितच.
- शेतकरी: कुटुंबाची घरची शेती हवी पण मुलाने शेतकरी नव्हे तर नोकरदार असावा.
- कमी पगार: मुलाला किमान २५-३० हजार पगार हवा अशी ग्रामीण मुलींची अपेक्षा असते. शहरातील कमावत्या मुलींना तर आपल्यापेक्षा जास्त कमावणारा हवा असतो.
अपेक्षांच्या पातळीवर उपवर मुलामुलींनी थोडी तडजोड स्वीकारणे गरजेचे आहे. नुकताच कमवायला लागलेला मुलगा गलेलठ्ठ पगार, स्वतःचा फ्लॅट कसा घेऊ शकेल. सोनं पिकवणारी शेती असेल तर शेतकरी नवरा का नको, नोकरदार हवा असेल तर घरची शेती कशी करेल याचा विचार मुलीच्या पालकांनी केला पाहीजे. - वसंतराव मुळीक, मराठा वधू-वर सूचक केंद्र